बार्शी : तालुका प्रतिनिधी
पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार बार्शी तालुक्यात उघडकीस आला आहे. सूरज शहाजी कांबळे (रा. बाळे, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या 31 वर्षीय वडिलांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी घरीच असते. अपहरण करण्यात आलेल्या दिवशी त्यांची मुलगी आजारी असल्याने ती घरीच होती. सकाळी 10 च्या सुमारास फिर्यादी व पत्नी असे सर्वजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दोन मुले व मुलगी शाळेत गेले होते. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी कामावरून घरी आले असता, अपहरण करण्यात आलेली मुलगी ही घरी दिसली नाही.
त्यामुळे त्यांनी मुलांना तिच्याविषयी विचारणा केली असता त्यांनी ते शाळेतून आल्यापासून घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीचा गावात तसेच बार्शी व इतर ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिचा शोध घेत असताना त्यांनी सूरज शहाजी कांबळे याच्या घरी फोन करून विचारले असता, तोही कालपासून घरी नसल्याचे तसेच त्याचा मोबाईल बंद असल्याचे समजले. त्यामुळे आमची खात्री झाली की, मुलीस सूरज कांबळे याने फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.