होमपेज › Solapur › नगरसेवक म्हणून घ्यायची लाज वाटते

नगरसेवक म्हणून घ्यायची लाज वाटते

Published On: Feb 07 2019 1:21AM | Last Updated: Feb 06 2019 10:34PM
सोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून दोन वर्षांत नगरसेवकांना वॉर्ड विकासासाठी पाच पैसे निधी मिळाला नसून भाजपचे दोन मंत्री व पालिकेतील पदाधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळेच पालिकेची अशी स्थिती झाली असून नगरसेवक म्हणून घ्यायचीही लाज वाटत असल्याची जहरी टीका महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे यावेळी परिवहन सभापती शिवसेनेचे तुकाराम मस्केही उपस्थित होते.

पालिकेतील भाजपच्या सत्तेचा दोन वर्षांतील आढावा घेण्यासाठी आणि सत्ताधारी भाजप सपशेल फेल गेल्याचे सांगण्यासाठी नरोटे यांनी पालिकेतील पत्रकार संघाच्या कक्षात बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक नरसिंग कोळीही उपस्थित होते. मनपा सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर विषय न घेतल्यामुळे 100 विषय परत गेले असून 32 विषय अद्याप प्रलंबित आहेत. विषय न घेण्यामागे काय गौडबंगाल, असा सवाल नरोटे यांनी उपस्थित केला. शासनाकडून एलबीटीचे 48 कोटी अनुदान आले नाही. स्टेडियम कमिटी गाळेप्रकरणी आयुक्‍तांच्या कारवाईत अडथळा आणला. झोन समिती, स्थायी सभापती विषय पक्षांतर्गत वादामुळेच रखडले. नगररचना व सार्वजनिक आरोग्य अभियंता हे महत्त्वाचे पद अनेक वर्षांपासून रिक्‍तच आहे. सध्या सेवेत नसलेल्या चौगुले नावाच्या अधिकार्‍याकडे 1 कोटी 5 लाखांची अ‍ॅडव्हान्स थकबाकी आहे. शहराला घाण पाणीपुरवठा होतोय. 102 नगरसेवकांना दोन वर्षात निधी मिळालेला नाही. निवडणुका तोंडावर असल्याने लोकांसमोर कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे, नगरसेवक म्हणून घ्यायलाही लाज वाटते, असे नरोटे म्हणाले.

आयुक्‍त खासगीत सांगतात की, मी सभेसाठी विषय पाठवतो पण ते होत नाहीत. मिळकत करावर लावले जाणारे दरमहा 2 टक्के दंड, वारंट व नोटीस शुल्क माफीचा ठराव सभेत होऊनही आयुक्‍त अंमलबजावणी करीत नाहीत. डिजिटल पेमेंटला 5 टक्के सवलत कशी दिली. आणखीन 12 विषय असून ते लवकरच उजेडात आणू. आयुक्‍तांवर कोणी अविश्‍वास ठराव पालिका सर्वसाधारण सभेत आणल्यास काँग्रेस विचार करेल, असेही नरोटे म्हणाले. परिवहन सभापती मस्के म्हणाले, परिवहनच्या कामगारांना  पगार वाटपासाठी महापौर व पक्षनेते यांना आपण फोन करून बोलवले होते, पण ते आले नाहीत.