Sat, Oct 24, 2020 09:31होमपेज › Solapur › अवैध धंद्यांना थारा देणार नाही : सातपुते

सोलापूर : अवैध धंद्यांना थारा देणार नाही : सातपुते

Last Updated: Oct 18 2020 9:03PM
सांगोला : पुढारी वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसिंगवर आमचा भर राहणार असून, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा देणार नाही. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याबरोबरच झालेल्या गुन्ह्याची उकल करण्यास प्राधान्य असणार आहे. गुन्हेगारांवर वचक बसवून नागरिक व महिलांमध्ये  सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे सोलापूर ग्रामीणच्या नूतन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोला येथे सांगितले.

सातपुते यांनी गुरुवारी सांगोला पोलिस स्टेशन येथे भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पो. नि. राजेश गवळी, स.पो.नि.सुरेश नलवडे, प्रशांत हुले उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते पुढे म्हणाल्या की, मागील आठवड्यात मी सोलापूर ग्रामीण अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने सर्वच पोलिस स्टेशनला भेट देणार आहे. त्यानुसार आज सांगोला तालुका भेटीसाठी आले आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील सर्व  पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील  गुन्हे  तसेच  अधिकारी-कर्मचारी  यांची प्राथमिक माहिती घेणे यासाठी आजची भेट होती. 
जिल्ह्यात महिला पोलिस अधिकार्‍यांची संख्या मर्यादित असली तरी ज्याठिकाणी महिलांचे गुन्हे जास्त आहेत व गरज आहे अशा ठिकाणी महिला अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल. सध्या सोलापूर जिल्ह्यात नवीन अनेक पोलिस स्टेशनचे प्रस्ताव आले आहेत. त्याचा पाठपुरावा करून सांगोला तालुक्यास  गरज असेल तिथे पोलिस स्टेशन होण्यासाठी प्रयत्नशील राहू. येणार्‍या काळात नवरात्र महोत्सवात नागरिकांनी देवीचे उत्सव साधेपणाने साजरा करावयाचे आहेत.  

उत्सवादरम्यान कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियम, अटीनुसार नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोव्हिड संक्रमण होणार नाही, याचे गांभीर्य लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरे करूया, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

 "