Sun, Aug 09, 2020 11:24होमपेज › Solapur › अवैध सावकारीने गोरगरीब, कष्टकरी वेठीस!

अवैध सावकारीने गोरगरीब, कष्टकरी वेठीस!

Published On: May 23 2018 1:13AM | Last Updated: May 23 2018 12:27AMसोलापूर : पुढारी चमू

मागील चार दिवसांपूर्वीच ‘म्होरक्या’ या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अवैधरित्या सावकारी करणार्‍यांची एक टोळी कार्यरत आहे. या अवैध सावकारांच्या दमदाटीला घाबरून गोरगरीब नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. गत वर्षभरात ज्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे  तक्रारी केल्या अशा शहरातील तब्बल 18 सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.  ग्रामीण भागातील फक्‍त 9 सावकारांवर फौजदारी कारवाई करण्यात आली.  

अवैध  सावकारीने सोलापूर शहरासह ग्रामीण  भागाला विळखा घातला  आहे. परंतु या अवैध सावकारीवर अंकुश  ठेवण्यात जिल्हा उपनिबंधकांना यश आले ना पोलिस प्रशासनाला जरब ठेवता आली आहे. त्यामुळे   या सावकारांना घाबरून आतापर्यंत 100 हून अधिकजणांनी आत्महत्या केल्या आहेत.   

दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झालेल्या  तक्रारींनंतर जिल्हा उपनिबंधकांकडून  सोलापूर शहरातील 29 सावकारांवर छापे टाकण्यात आले या सावकारांकडून कोरे चेक, बाँड तसेच इतर  कागदपत्रे जप्‍त  करण्यात आली आहेत. यातील 18 सावकारांवर गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. 

ग्रामीण  भागात अक्‍कलकोट तालुक्यात पाच सावकारांवर धाडी टाकून तीनजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये तीन सावकारांवर छापे टाकण्यात आले. त्यातील दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बार्शी तालुक्यातील चार सावकारांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्‍त एका सावकारावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगोला तालुक्यात केवळ दोन सावकार  सापडले. त्यापैकी एकावर फौजदारी कारवाई करण्यात आली. मोहोळ तालुक्यातील दोघा सावकारांवर धाडी टाकून दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यांत मात्र उपनिबंधक कार्यालयास एकही अवैध सावकार सापडला नसल्याचे सांगण्यात आले. 

परवानाधारक सावकारांविरोधात 143 प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील 84 प्रकरणांवर अद्याप सुनावणी चालू आहे. या तक्रारींपैकी जिल्ह्यातील 36 शेतकर्‍यांना सावकारांकडे अडकलेली सुमारे 40.84 हेक्टर जमीन तसेच  स्थावर मालमत्ता  परत करण्यात आली आहे. पैसे  वेळेवर परत करणे जमत नसल्याने अनेकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

- अमोल व्यवहारे, वेणुगोपाल गाडी,  रामकृष्ण लांबतुरे, रणजित वाघमारे

खासगी सावकार, मायक्रो फायनान्सच्या विळख्यात श्रमजीवी

सोलापूर :

सोलापूर हे कामगार अर्थात श्रमजीवींचे शहर म्हणून ओळखले जाते. आर्थिक अडचणींमुळे बहुतांशी कामगार हे खासगी सावकार व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. मात्र या कर्जाच्या विळख्यात कामगार सापडले आहेत. 

विडी व यंत्रमाग उद्योगात हजारोंच्या संख्येने कामगार आहेत. यातील प्रामुख्याने विडी कामगारांमध्ये खासगी सावकार व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण खूप आहे. खासगी सावकारांकडून चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जात असल्याने कर्जाचा डोंगर वाढतच जातो.  मात्र  ते  फेडणे अशक्य असल्याने कामगारवर्ग  अडचणीत येतो. मायक्रो कंपन्यांकडून मलिहा बचत गटांना कर्जपुरवठा केला जातो. एका गटात 20 सदस्य असतात. वास्तविक स्वयंरोजगार व लहान उद्योगासाठी हे कर्ज घेण्यात येते. मात्र बहुतांश सदस्य या कर्जाचा वापर विवाह, समारंभ आदी घरगुती कारणांसाठी करतात, असे पााहावयास मिळते.

बचत गटात जर एका सदस्याने हप्ता भरला नाही तर उर्वरित सदस्यांना ते फेडण्याची सक्ती आहे. यावरुन बचत गटात वाद  उद्भवतात. कर्ज फेडण्यासाठी सावकार व कंपन्यांचा तगादा हा नेहमीच असतो. याला वैतागून तसेच कर्ज फेडणे अशक्य झाल्याने अनेक कामगार हे पळून गेल्याचीही उदाहरणे आहेत. कर्जापायी कामगारांवर होणार्‍या अन्यायाविरोधात विविध संघटना खासगी सावकार वा मायक्रो कंपन्यांच्यांविरोधात पोलिस तसेच अन्य सरकारी कार्यालयांकडे तक्रारी देतात. 

अवैध पद्धतीने तसेच जाचक अटींवर वित्तपुरवठा करणार्‍यांविरोधात सर्वाधिक तक्रारी असल्याची   माहिती  आहे. अलीकडे काही सहकारी बँकांनीही बचत गटांना कर्ज देण्याचे धोरण आखले आहे. मात्र कायदेशीर नियमांच्या आधारावर या कर्जासंदर्भात काम चालत असल्याचे सांगितले जाते. खासगी सावकार वा मायक्रो कंपन्यांचे नियम व अटी  जाचक व अव्यवहार्य असल्याचा आक्षेप घेतला जातो. या तक्रारींबाबत प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.