Thu, Jun 04, 2020 12:28होमपेज › Solapur › घराणेशाही सुरूच; दुसरी-तिसरी पिढी रिंगणात

घराणेशाही सुरूच; दुसरी-तिसरी पिढी रिंगणात

Last Updated: Oct 09 2019 10:26PM
मनोज आवाळे

राज्याच्या राजकारणावर काही ठरावीक  घराण्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणूक कुठलीही असो, या घराण्यांना विचारात घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाचे राजकारण पुढे जात नाही. राज्याची यंदाची विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद ठरलेली नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार यादीवर नजर टाकली तर राजकीय घराणेशाहीला प्राधान्य मिळाल्याचे दिसून येते. यात एके काळी घराणेशाहीवर टीका करणारा भाजपही मागे नाही. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर विशिष्ट लोकांचे वर्चस्व आहे. उमेदवार यादीतून ते दिसून येत आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. तर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील यांना पुन्हा निलंगामधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र अमित व धीरज देशमुख यांना अनुक्रमे लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघांतून उभे करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे या सोलापुरातून पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. संगमनेरमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, भोरमध्ये संग्राम थोपटे, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, धारावीतून वर्षा गायकवाड, पुरंदरमधून माजी आमदार चंदूकाका जगताप यांचे पुत्र संजय जगताप, नवापूरमधून माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीष, रावेरमधून माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे पुत्र शिरीष चौधरी, सावनेरमधून सुनील केदार, चंद्रपूरचे खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पलूसमधून दिवंगत पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम, सांगलीतून माजी खासदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील, वर्ध्यातून शेखर शेंडे यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. तसेच कोल्हापुरातून शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे नातू व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठरावीक घराण्यांचा पक्ष समजला जातो. या पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट देताना आपला लौकिक कायम राखला आहे. बारामतीतून पुन्हा एकदा अजित पवार, वाळव्यातून जयंत पाटील, येवल्यातून छगन भुजबळ, नांदगावमधून पंकज भुजबळ, वाईतून मकरंद पाटील, आंबेगावातून दिलीप वळसे-पाटील, काटोलमधून अनिल देशमुख, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, परांड्यातून राहुल मोटे पुन्हा रिंगणात आहेत. तासगावातून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, हडपसरमधून माजी खासदार दिवंगत विठ्ठल तुपे यांचे पुत्र चेतन, जुन्नरमधून माजी आमदार वल्लभ बेनके यांचा मुलगा अतुल, शिरूरमधून अशोक पवार, माढ्यातून बबनराव शिंदे, पुसदमधून माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील, कोपरगावातून माजी आमदार अशोक काळे यांचा मुलगा आशुतोष, परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, नगरमधून संग्राम जगताप, गेवराईतून माजी आमदार शिवाजीराव पंडित यांचे पुत्र विजयसिंह, कळवणमधून माजी मंत्री ए. टी. पवार यांचा मुलगा नितीन, देवळालीतून सरोज अहिरे, शेवगावमधून माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखविला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती या श्रीवर्धनमधून लढत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून नशीब अजमावत आहेत. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्याचप्रमाणे खेडमधून रामदास कदम यांचे पुत्र योगेश, माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश यांना देवळालीतून, माजी मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला गावित इगतपुरीतून, तर माजी मंत्री दिगंबर बागल यांची कन्या रश्मी बागल करमाळ्यातून  रिंगणात आहे. विक्रोळीतून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

कणकवलीतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, पुण्यातील शिवाजीनगरमधून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ, कँटोन्मेंटमधून माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे, कसब्यातून मुक्ता टिळक, मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, पुसदमध्ये नीलय नाईक, शेवगावातून मोनिका राजळे, कोपरगावातून स्नेहलता कोल्हे, नाशिकमधून हिरे घराण्यातील सीमा हिरे, नवापूरमधून भारत माणिकराव गावित, कोल्हापुरातून अमल महाडिक, वाईतून मदन भोसले, गेवराईतून लक्ष्मण पवार, अकोल्यातून वैभव पिचड, हिंगण्यातून समीर मेघे, ऐरोलीतून गणेश नाईक, नाशिक पूर्वमधून राहुल उत्तमराव ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या परळीतून उभ्या आहेत. जालन्यातून संतोष रावसाहेब दानवे, औरंगाबादमधून अतुल मोरेश्वर सावे, तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील, कराड उत्तरमधून अतुल भोसले, खामगावातून आकाश पांडुरंग फुंडकर, सातार्‍यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, पनवेलमधून प्रशांत ठाकूर, विक्रमगडमधून डॉ. हेमंत विष्णू सावरा, केजमधून नमिता मुंदडा, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील, कुलाब्यातून विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 

सांगोल्यातून ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रायगड जिल्ह्यातील उमेदवारीवर पाटील घराण्याचेच वर्चस्व आहे. पेणमध्ये धैर्यशील पाटील, पनवेलमधून बाळाराम पाटील, ऊरणमधून विवेक पाटील तर अलिबागमधून सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील हे पाटील घराण्यातील सदस्य उभे आहेत. एकंदरीत सर्वच पक्षांनी ‘आम्हीच चालवू राजकीय घराणेशाहीचा वारसा’ असाच नारा दिला आहे.