Fri, Jul 03, 2020 22:33होमपेज › Solapur › महापौर, उपमहापौर पदांसाठी आज निवडणूक

महापौर, उपमहापौर पदांसाठी आज निवडणूक

Last Updated: Dec 04 2019 1:09AM
सोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि. 4 डिसेंबर) निवडणूक होत असून पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या बंडाळीमुळे सत्ताधारी भाजप तणावात आहे, तर ‘महाआघाडी’ यशस्वी करणे आणि आपले नगरसेवक पळवापळवीपासून सुरक्षित ठेवण्याची दुहेरी धावपळ ‘महाआघाडी’तील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांची होत आहे.  भाजपमधील बंड शमले तर महापौर, उपमहापौर भाजपचा होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेविका श्रीकांचना यन्नम, तर उपमहापौर पदासाठी राजेश काळे यांना संधी देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी उपमहापौरपदासाठी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. महापौर, उपमहापौरपदासाठी पालिकेेतील काँग्रेस, शिवसेना, ‘एमआयएम’, राष्ट्रवादी या ‘महाआघाडी’कडूनही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. विजय की बंडखोरीमुळे भाजपला फटका आणि ‘महाआघाडी’ यशस्वी होणार की फुटणार, हे बुधवारी निवडणुकीदिवशीच  स्पष्ट होणार आहे.

सोलापूर महापालिकेच्या यंदाच्या महापौरपदासाठी ‘ओबीसी महिला’ असे आरक्षण पडले आहे.  सत्ताधारी भाजपने महापौरपदी यन्नम, तर उपमहापौरपदासाठी काळे यांना संधी दिली आहे. यन्नम ‘मान्य’ पण काळे ‘अमान्य’ची भूमिका घेत उपमहापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वल्याळ यांच्या नेतृत्वात भाजपच्या सात नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. बंड शांत झाल्यास भाजप विजयी होईल पण बंडखोर ठाम राहिल्यास भाजपला फटका बसू शकतो. 

भाजपमधील बंडखोरीचा लाभ मिळेल म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘एमआयएम’ यांनी पालिकेत ‘महाआघाडी’ करत महापौर, उपमहापौर निवडणुकीत आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेच्या सारिका पिसे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, ‘एमआयएम’च्या शहाजिदाबानो शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून अमोल शिंदे, काँग्रेसचे नरसिंग कोळी, ‘एमआयएम’च्या तस्लीम शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव, शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, ‘एमआयएम’च्या शहाजिदाबानो शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

बंडखोरांना शांत करत भाजप विजयी होणार, ‘महाआघाडी’तील नगरसेवक फोडणार आणि ‘महाआघाडी’ भाजपच्या बंडाचा लाभ उठवत सर्व विरोधी सात पक्षांना एकत्रित आणण्यात यशस्वी होणार की, भाजपकडून ‘महाआघाडी’चे नगरसेवक फुटणार या सर्व घडामोडींचे बुधवारी निवडणुकीदिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात ‘महाविकास’ आघाडी झाल्यानेे सोलापुरातही हाच पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा सर्व प्रकार पाहता राजकारणातील नैतिकताच पणाला लागल्याचे जाणवत आहे.