Mon, Sep 28, 2020 13:38होमपेज › Solapur › महूद येथे दिव्यांगांचा उघड्यावर संसार

महूद येथे दिव्यांगांचा उघड्यावर संसार

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 22 2018 11:14PMसांगोला : वार्ताहर

महूद ( ता.सांगोला ) येथील दिव्यांग कुटुंबाचे घर उघड्यावर  असून या कुटुंबास शासकीय मदतीची आणि योजनेच्या लाभाची प्रतीक्षा आहे. महूद ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या ढाळेवाडी येथील शासकीय जागेत सोनवणे कुटुंब राहत आहे. या कुटुंबात एकूण 4 व्यक्‍ती असून त्यापैकी दोन दिव्यांग आहेत. तर चौथा हा युवराज नावाचा लहान मुलगा आहे. गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसात या कुटुंबातील मुख्य सदस्य असलेल्या बबन सोनवणे यांचे निधन झाले. ते वयस्कर असल्यामुळे त्यांना चालता फिरता येत नव्हते. त्याचबरोबर दिव्यांग असल्यामुळे आणखीनच त्यांच्या दुखात भर होती. तर दुसर्‍या बाजूला त्यांची पत्नी रुक्मिणी सोनवणे ही वयोवृध्द असल्याने तसेच मुलगी आक्काताई गाळके ही डोळ्याने दिसत नसल्यामुळे दिव्यांगच आहे. या कुटुंबाला हक्काचे घर नाही ना हक्काची जागा परंतु शासनाच्या योजनांचा यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नाही. साहजिकच या कुटुंबाला कुणी आधार देता का आधार असे म्हणायची वेळ आली आहे.

रात्री-अपरात्री पाऊस आला की, नजीकच असणार्‍या स्मशान भूमीचा आधार घ्यायची वेळ या कुटुंबावर येत असते. पक्के घरच नसल्यामुळे वीजेचा तर प्रश्‍नच नाही त्यामुळे या कुटुंबाला प्रत्येक रात्र म्हणजे काळ रात्रच असे. दिवस उजाडला की या कुटुंबाला जीवात जीव आल्यासाखे वाटत असे. हे कुटुंब कधी दुसर्‍याकडून अन्न मागून आणते तर कधी उपाशीपोटी राहून आपले जीवन जगत आहे. दिव्यांगांच्या 3 टक्के निधीतून महूद ग्रामपंचायतीने यांना 7 हजार रुपये इतक्या निधीत घरासाठी 4 पत्रे व 4 सिमेंटचे खांब दिले खरे परंतु कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे व मिळालेली ही अपुरी मदत त्यांना हक्काचे घरही देवू शकले नाही. 

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाने महूद ग्रामपंचायतीकडे याबाबत पाठपुरावा केला  परंतू ग्रामपंचायतीने या कुटुंबाकडे सहानभूतीने पाहिले नाही. कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही अशा स्थितीत राहणार्‍या सोनवणे कुटुंबाला दिव्यांगांच्या 3 टक्के निधीतून भरीव मदत करता येत होती. परंतु ग्रामपंचायत मात्र या गंभीर बाबीकडे डोळेझाकपणे पाहत असल्याचा संताप प्रहार संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.