होमपेज › Solapur › अन्यथा बंधार्‍यांची दारे काढू देणार नाही

अन्यथा बंधार्‍यांची दारे काढू देणार नाही

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:15PM सोलापूर :  प्रतिनिधी

ग्रामीण जनतेला पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता नाही का? शेतकर्‍यांना जनावरांच्या पिण्यासाठी व चार्‍यासाठी पाणी नाही मिळाले तर हे पशुधन कसे सांभाळायचे? शेतकर्‍यांना सरकार पाणी नाही देणार तर मग काय हे काम सुद्धा देवालाच करावे लागणार का? असा संतप्त सवाल करीत कोळेगाव बंधार्‍यापर्यंत हक्काच्या साडेतीन टीएमसी पाण्याचा अगोदर हिशोब द्यावा आणि मगच बंधार्‍यांची दारे काढावीत. मावळसारखी घटना घडली तर अंगावर गोळ्या झेलू, असा खणखणीत इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन राजन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अनगर येथील लोकनेते शुगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील सीना नदीवर बोपले, अनगर, मलिकपेठ, कोळेगाव व शिरापूर (सो) येथे बंधारे आहेत. अनगर, बोपले, पासलेवाडी, गलंदवाडी, एकुरके, कुरणवाडी, खंडोबाचीवाडी, बिटले, घाटणे, खरकटणे, मलिकपेठ, दाईंगडेवाडी, आष्टे, कोळेगाव, नरखेड, शिरापूर (सो) या गावांसह 40 हजार लोकवस्ती असणार्‍या मोहोळ नगरपरिषदेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. जर शासनाच्या शेतकरी विरोधी व ग्रामीण भागाच्या हित न पाहण्याच्या कार्यपद्धतीवर अधिकारीही हो ला हो म्हणून काम करीत असतील तर मग ग्रामीण भागातील जनता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याचा हिशोब द्या
मोहोळ तालुक्याच्या वाट्याला व हक्काचे असणारे साडेतीन टीएमसी पाणी आहे. दोनदा सोडलेल्या आवर्तनातून साधारणपणे दीड ते पावणेदोन टीएमसी पाणी आम्हाला मिळाले असेल मग शिल्लक राहिलेले पावणेदोन टीएमसी पाणी कोठे गेले. याचा अगोदर हिशोब दिला पाहिजे. आता जे आवर्तन सीना नदीत सोडण्यात येणार आहे, त्यासाठी नदी काठावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असून बंधार्‍यातील सर्वच दारे काढण्यात येणार असल्याचे समजते. मग सीना नदीत पाणी कशासाठी सोडणार आहेत. फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठीच का? या आवर्तनात सीना नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, सीना नदीकाठावरील विद्युत पुरवठा खंडित करू नये, असेही यावेळी राजन पाटील म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.