Sat, Oct 31, 2020 12:36होमपेज › Solapur › आश्‍वासन नको आता थेट मदतच हवी!

सोलापूर : आश्‍वासन नको आता थेट मदतच हवी!

Last Updated: Oct 18 2020 8:53PM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापूर शहर व जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाला आलेले पीक पाण्यात गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीला आहे. त्यामुळे  नको पंचनामा, नको आश्‍वासन आता थेट हवी आर्थिक मदत, असा आर्त टाहो जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी फोडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोमवारी सोलापूर जिल्हा दौर्‍यावर येत असून ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून नागरिक आणि शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौर्‍यावर येऊन गेले आहेत. तर विरोधी पक्षाची नेतेमंडळीही सोमवार, 19 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची मोठी धावपळ सुरू असली तरी या नुकसानीने बेजार झालेले शेतकरी मात्र डोक्याला हात लावून बसले आहेत. गेल्या 14 व 15 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास 93.6 मिमी पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात पूर आला. या पुरामुळे शेतकर्‍यांच्या शेती पिकांसह दावणीला असलेली जनावरेही दगावली. 14 व्यक्तींचा अतिवृष्टी, पुरामुळे मृत्यू झाला आहे. काही शेतकर्‍यांची काढणीला आलेली पिके तर काही शेतकर्‍यांची काढून शेतात ठेवलेली पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. अनेकांची ऊस शेती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. फळबागा पुरत्या आडव्या झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अतिवृष्टीने अनेकांचे छत्र हरपले आहे. अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील जवळपास 2 हजार 208 घरांची अंशत: तर 48 घरे पूर्णपणे पडली आहेत. 

जिल्ह्यातील जवळपास 57 पाझर तलाव, बंधार्‍यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक गावातील बंधारे आणि रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे काही गावची वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यातील 214 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 8 हजार 608 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 32 हजार 521 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील 623 गावांना बसला आहे. 8 हजार 555 लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात या महापुराचा हाहाकार माजला असताना, अशा परिस्थितीत आता दिलासा, आश्‍वासन नको तर थेट मदत करण्याची मागणीच शेतकर्‍यांनी लावून धरली आहे. दरम्यान, खरीप पिकांसह ऊस आणि फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामही वायाच जाणार आहे. शेतात अजूनही गुडघाभर पाणी आहे. मंत्र्यांनी केवळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्या तरी अनेक तलाठी महोदय नुकसानग्रस्त गावांकडे फिरकलेही नाहीत. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे सरसकट मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दुहेरी संघर्ष करावा लागत आहे. यापूर्वी आलेल्या मंत्र्यांनीही पाहणी करून केवळ आश्‍वासनांची खैरातच दिली आहे. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून अशा अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने आपण शेतकर्‍यांना थेट आर्थिक मदतच जाहीर करावी, अशी मागणी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी लावून धरली आहे.

14 जणांचा मृत्यू, चार वाहने वाहून गेली 

या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास 4 वाहने वाहून गेली आहेत. यामध्ये बार्शीत 2, करमाळा 1, मोहोळ 1, तर जवळपास 14 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील 1, माढा तालुक्यात 3, करमाळा 3, तर पंढरपूर तालुक्यात जवळपास 7 व्यक्तींचा या अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेकांचे छत्र हरपले आहे, तर अनेकांच्या जगण्याचा आधार गेला आहे. त्यामुळे आता येऊन केवळ सांत्वन अथवा दिलासा नको, तर थेट बाधित शेतकर्‍यांना आणि मृत्यू पावलेल्यांच्या वारसाला मदत मिळावी, अशी मागणी अनेकांनी लावून धरली आहे.

 "