होमपेज › Solapur › दिलीप माने, रश्मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

दिलीप माने, रश्मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

Published On: Oct 03 2019 2:16AM | Last Updated: Oct 02 2019 11:44PM
सोलापूर ः प्रतिनिधी

शहर ‘मध्य’ मतदारसंघातून काँग्रेसमधून आलेले दिलीप माने आणि करमाळा मतदासंघातून राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवससेनेने अखेर उमेदवारी जाहीर केली आहे. करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील व शहर ‘मध्य’चे इच्छुक जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचा पत्ता ऐनवेळी कापल्याने दोघे नाराज असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांत आहे. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहर मध्य आणि करमाळा मतदारसंघात शिवसेना कोणाला उमेदवारी देणार यावरून गेल्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते. दोन्ही मतदारसंघांतील इच्छुक मुंबईत ‘मातोश्री’ वर तळ ठोकून होते. उमदेवारी कोणाला मिळणार यावरून सर्वांनी देव पाण्यात ठेवले होते. अखेरीस शिवसेनेने ‘आयारामां’ ना न्याय देत दिलीप माने व रश्मी बागल यांना उमेदवारी घोषित केली, तर बार्शी मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेले दिलीप सोपल यांनादेखील सेनेने अगोदरच उमेदवारी घोषित केली आहे. सांगोला मतदारसंघातदेखील काँग्रेससमधून आलेले माजी आमदार शहाजी पाटील यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. मोहोळ मतदारसंघात भाजपमधून सेनेत आलेले नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे.

जिल्ह्यातील 11 पैकी 6 मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले असून या सहापैकी पाच मतदारसंघांत शिवसेनेने एकूणच ‘आयारामां’ना उमेदवारी दिल्याचे दिसत आहे. माढा मतदारसंघातील उमेदवार अद्याप शिवसेनेने जाहीर केला नाही, पण राष्ट्रवादीचे आ. बबन शिंदे यांनी सेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आ. शिंदे माढ्यात सेनेचे उमदेवार घोषित झाले तर मात्र शिवसेनेच्या सहा जागांवर ‘आयारामांची’च वर्णी लागणार आहे.माढ्यातून ना. तानाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनीदेखील उमदेवारी अर्ज नेला असल्याने त्यांचीही शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरीची शक्यता

शिवसनेचे करमाळ्याचे आ. नारायण पाटील आणि शहर ‘मध्य’चे इच्छुक जिल्हाप्रमुख महेश कोठे हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असून, त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट होणार आहे. बार्शी मतदारसंघ भाजपला न सुटल्याने इच्छुक राजेंद्र राऊत हे सोपल यांच्याविरोधात बंडखोरी करण्याची शक्यता आहे. मोहोळमध्ये नाराज उमदेवार मनोज शेजवाल यांनीही बंडखोरीचे संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील 11 पैकी करमाळा, सांगोला, माढा, मोहोळ, बार्शी, शहर मध्य हे सहा मतदारसंघ शिवसेनेकडे, शहर उत्तर, सोलापूर दक्षिण हे भाजपकडे, पंढरपूर व अक्कलकोट रयत क्रांती आणि माळशिरस ‘रिपाइं’ या मित्रपक्षांच्या वाट्याला आले आहेत.