Fri, Jul 03, 2020 21:40होमपेज › Solapur › देशमुख-दिलीप माने भेटीनंतर उपमहापौर निवडणुकीत ट्विस्ट

देशमुख-दिलीप माने भेटीनंतर उपमहापौर निवडणुकीत ट्विस्ट

Last Updated: Dec 03 2019 10:22PM
सोलापूर ः प्रतिनिधी

महापौर, उपमहापौर निवडणूक बुधवारी होत असून तत्पूर्वी मंगळवारी नाट्यमय राजकीय घडामोडीअंतर्गत माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे दिलीप माने यांच्यात झालेल्या बंदखोलीतील बैठकीनंतर उपमहापौर निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

त्यामुळे बुधवारी महापौर निवडणूक तर निर्विघ्न पार पडेल; पण अचानक घडामोडी घडून भाजपचे उमेदवार राजेश काळे, शिवसेनेचे उमेदवार भारतसिंग बडूरवाले किंवा भाजपचे बंडखोर नागेश वल्याळ यांच्यापैकी एक जण उपमहापौर होण्याची शक्यता आहे.  

महापौर व उपमहापौर निवडणूक बुधवारी होत असून या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडे जवळपास बहुमत असतानाही पक्षांतर्गत बंडखोरीमुळे भाजप अडचणीत आले आहे. भाजपने उपमहापौरपदाची संधी   माजी सहकारमंत्री गटाचे नगरसेवक राजेश काळे यांना दिली. काळे यांच्या उमेदवारीला विरोध करत माजी सहकारमंत्री गटाचेच नगरसेवक नागेश वल्याळ यांनी बंडखोरी करत उपमहापौरपदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. वल्याळ यांच्या अर्जावर भाजपचेच नगरसेवक संतोष भोसले व सुभाष शेजवाल यांनी स्वाक्षरी केली आहे. यांच्यासोबत बंड केलेले आणखीन चार नगरसेवक मंगळवारी स्वगृही परतल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपच्या एकूण 49 नगसेवकांपैकी 3 नगरसेवकांचे बंड मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शमले नव्हते.

दरम्यान, मंगळवारी भाजप आ. विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार शिवसेनेचे दिलीप माने यांच्यात ब्रह्मदेव माने बँकेत बंदखोलीत चर्चा झाली आहे. दिलीप माने यांच्याकडे शिवसेनेचे पाच नगरसेवक आहेत. तर भाजपला बंडखोर तीन नगरसेवक वगळता महापौर निवडणुकीत विजयासाठी 5 नगरसेवकांची कमतरता आहे. माने-देशमुख यांच्यात तह झाला असल्यास महापौर निवडणुकीत माने भाजपला मदत करू शकतात आणि त्या मदतीच्या बदल्यात माने गट शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले यांना उपमहापौर होण्यासाठी भाजपचा विजयकुमार देशमुख गट मदत करू शकतो. असे झाल्यास माने गटाचे विरोधक असलेले शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी विधानसभा निवडणुकीत माने यांच्या विरोधात केलेल्या बंडखोरीचे उट्टे माने यांच्याकडून काढले जाऊ शकते.

असे झाल्यास शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीचा फज्जा उडू शकतो. तर बुधवारी निवडणुकीपर्यंत भाजपची गटबाजी संपल्यास भाजपचे 49 नगरसेवक होतील. त्यांना आणखीन दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपाचा महापौर आणि उपमहापौर होईल. त्यासाठी मोठी राजकीय खलबते होण्याची गरज आहे. बुधवारी सकाळी 11.30 वाजता निवडणुकीवेळीच आता नेमके चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

भाजपचे नगरसेवक सध्या महाबळेश्‍वर व सातार्‍यात सहलीचा आनंद घेत आहेत. तर काँग्रेस-शिवसेना महाआघाडीचे नगरसेवक पुण्यात हॉटेलवर मुक्‍कामास आहेत. बुधवारी सकाळी निवडणुकीवेळी सर्वच नगरसेवक थेट महापालिकेत हजर होणार आहेत.