होमपेज › Solapur › चौपाड परिसरात दूषित पाणीपुरवठा 

चौपाड परिसरात दूषित पाणीपुरवठा 

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:46PMसोलापूर : प्रतिनिधी 

‘अमृत’ योजनेंतर्गत उजनी ते सोलापूरदरम्यानच्या जलवाहिनीतील सुमारे दीड किलोमीटरची जुनी जलवाहिनी बदलण्यात आल्यानंतर सोलापुरात सुरु झालेल्या दूषित पाण्याचा सिलसिला काल एक दिवसाच्या ब्रेकनंतर आज (शुक्रवार) पुन्हा सुरु झाला. आज चौपाडमधील गणेश मंदिराच्या परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याने नागरिक चांगलेच वैतागले.

केेंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत उजनी ते सोलापूर जलवाहिनीत अनेक ठिकाणी दुरुस्त्या केल्या खर्‍या; मात्र त्यातील त्रुटींमुळे सोलापूरकरांच्या नळाला मात्र दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येत आहे. महापालिकेने जरी हे पिण्यायोग्य पाणी असल्याचे सांगितले असले तरी ते पाणी केवळ चूळ भरण्यासाठी वापरल्यानंतरसुध्दा अनेकांना पोटाचे विकार होत असल्याची तक्रार नागरिकांना केली आहे. त्यामुळे ‘अमृत’ योजनेतील जलवाहिनीची दुरुस्ती सोलापूरकरांसाठी विषारी ठरते आहे, असे चित्र आहे.

‘अमृत’ योजनेतून उजनी ते सोलापूरदरम्यानची मुख्य जलवाहिनीतील सुमारे दीड किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याचे काम महापालिकेने 25 जुलै ते 28 जुलैपर्यंत केले होते. 
त्यानंतर 29 जुलैपासून पाणीपुरवठा सुरु झाला खरा; मात्र दीड-दोन वर्षांपासून रस्त्यावर पडून असलेल्या नव्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या मातीमुळे सलग तीन दिवस दूषित पाणीपुरवठा झाला होता. मात्र त्यानंतर काल (गुरुवार) स्वच्छ पाणी आले खरे; मात्र आज चौपाड भागात पुन्हा दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांनी  नळाला येणार्‍या पाण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

स्थानिक जलवाहिनी नादुरुस्त असेल : दुलंगे
गढूळ पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठा अधिकारी गंगाधर दुलंगे म्हणाले की, ‘अमृत’ योजनेंतर्गत कारंबा नाका ते पर्ल गार्डनदरम्यान टाकलेल्या नव्या जलवाहिनीच्या स्वच्छतेसाठी तब्बल नऊ तास आम्ही वॉशआऊट (पाणी सोडले) प्रक्रिया राबविली होती.  तरीदेखील काही ठिकाणी दूषित पाणी आले. मात्र तीन दिवसांत सातत्याने त्या जलवाहिनीतून पाणी येत असल्याने काल (गुरुवार) सगळीकडे शुध्द पाणी आले होते. आज चौपाडमध्ये पाण्याचा दिवस नाही. तरीदेखील तेथे पाणी आले असेल तर तेथील झोन कार्यालयांतर्गत असलेल्या जलवाहिनीमध्ये काही खराबी झाल्याची शक्यता आहे. ती तातडीने शोधून दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या जातील.

संजय कोळींवर कारवाईची मागणी 
पिण्याच्या पाईपलाईनमधून दूषित पाणी आल्यामुळे महापालिका सभागृहनेते संजय कोळी यांनी महापालिकेचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांना प्रभागात कामाचा बहाणा करून बोलावून त्यांना शिवीगाळ करत त्यांचा तृतीयपंथी व्यक्तीच्या हस्ते उपरोधिक सत्कार केला. 

सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून कायदा हातात घेतला जात असून मागासवर्गीय समाजातील अधिकार्‍याला अवमानित केल्याप्रकरणी कोळी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्यावतीने करण्यात आली. याबाबत स्वाभिमानीचे शहराध्यक्ष परशूराम मब्रुखाने यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.