Thu, Jul 09, 2020 23:27होमपेज › Solapur › उमेदवार प्रचारात दंग, निवडणुकीत चढला रंग

उमेदवार प्रचारात दंग, निवडणुकीत चढला रंग

Published On: Mar 30 2019 1:32AM | Last Updated: Mar 29 2019 11:36PM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीनही उमेदवार प्रचाराला लागल्याने निवडणुकीची रंगत चढू लागली असून ‘वंचित बहुजन आघाडी’ने गाठीभेटी सुरू केल्या आहेत. काँग्रेसनेही जुळवाजुळव सुरु करत दलित, ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली आहे. भाजपनेही गाफील न राहता मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून जोडाजोडी अभियान सुरू केले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांच्यासह मेगास्टार चिरंजीवी येणार असल्याने त्यांची चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोलापूर मतदारसंघात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्याच टप्प्यात सभा घेण्याचा सपाटा लावला असून त्यांच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता भाजप अन् काँग्रेस दोघांचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसनेदेखील कंबर कसत देशपातळीवरील नेतृत्वाच्या सभा लावत गावपातळीवरही संपर्क मोहीम गतिमान केली आहे. 

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात  केली होती. आता आंबेडकर यांनी आपल्या टीकेचा रोख भाजपकडे वळविला आहे. मतदारसंघात गाठीभेटी  घेताना आंबेडकर आणि मतदारसंघात फिरताना शिंदे संधी मिळेल तिथे एकमेकांवर टीकास्त्र डागत आहेत. दुसरीकडे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी मात्र कुणावर टीका न करता कार्यकर्ते, नेते यांच्यामार्फत आपल्या प्रचाराची यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपला सामना भाजपशीच असल्याचे सांगितले असताना दुसरीकडे काँग्रेसनेही सुशीलकुमार शिंदे यांचा सामना ‘वंचित बहुजन आघाडी’चे  उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीच होणार असल्याचे सांगितले आहे. ‘एमआयएम’ आणि भाजप हे दोन्ही पक्ष जातीयवादाला खतपाणी घालणारे आहेत. पण मतदार जातीयवाद्यांना स्वीकारणार नाहीत. योग्य काम केलेले काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनाच या निवडणुकीत पाठिंबा देतील, असे काँग्रेसचे निवडणूकप्रमुख प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले आहे. ‘वंचित बहुजन विकास आघाडी’साठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हेच स्टार प्रचारक आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलुगु अभिनेते चिरंजीवी आदी प्रामुख्याने येणार आहेत. भाजपचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. 

भाजपचे राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा घेण्यासाठी पालकमंत्री आणि सहकारमंत्री प्रयत्नशील आहेत. एकाच दिवशी सोलापूर तसेच माढा मतदारसंघांत प्रचार सभा घेण्यासाठी  भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. गतवेळी काँग्रेससोबत असलेल्या ‘माकप’ने आपली भूमिका स्पष्ट केली नाही.