Wed, May 12, 2021 01:31
भालकेंच्या सहानुभूतीपेक्षा आवताडेंचा अनुभव भारी 

Last Updated: May 04 2021 2:00AM

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत स्व. भारत भालके यांच्या निधनाने भगीरथ भालके यांना सहानुभूती मिळाली. त्याआधारे त्यांनी कडवी टक्करही दिली.  पण निवडणुकीचा अननुभव, महाविकास आघाडी सरकारची धोरणे मात्र पराभवासाठी मारक ठरली. दुसरीकडे भाजपचे समाधान आवताडे यांना आमदार प्रशांत परिचारक गटाची मतविभागणी टाळणे आणि दोनवेळा निवडणुकीच्या पराभवातून आलेला अनुभव, आता अस्तित्वाच्या लढाईसाठी वाट्टेल ते यामुळेच आवताडे यांना निसटता का होईना विजयश्री देऊन गेला.

स्व. आ. भारत भालके यांच्या अकाली निधनामूळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक झाली.  स्व.आ. भारत भालके यांनी 2019 ला राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकत हॅट्रिक केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी असली तरी सहाजिकच ही जागा राष्ट्रवादीकडेच होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची ही निवडणूक असली तरी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप महायुती यांच्यादृष्टीने ही अस्तित्वाची लढाईच बनली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेत भारत भालकेंची सहानुभूती इनकॅश करताना सर्व बाजूंनी नाराजी दूर करण्यासाठी खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी उमेदवार ठरवण्यात बराच वेळ गेला. 

त्याअगोदर भाजपने आ. प्रशांत परिचारक यांची मनधरणी करत उद्योजक समाधान आवताडे यांना उमेदवारी देत मतविभाजन टाळण्याचे धोरण राबवले.  जोडीला भाजपची राज्यातीलच काय केंद्रातील ताकदही पाठीशी उभारण्यासाठी चंग बांधला. समाधान आवताडेंसाठीही ही अस्तित्वाची असल्याने त्यांनी साम, दाम, दंड, भेद वापरण्याची तयारी ठेवली. त्यामुळे भाजपकडून तुल्यबळ आव्हान उभे करीत निवडणुकीचा पहिला टप्पा जिंकण्यात आला.

राष्ट्रवादीनेही स्व. भारत भालकेंच्या सहानुभूतीबरोबरच महाविकास आघाडीची ताकद भगिरथ भालके यांना उमेदवारी देतानाच उभी केली. त्यामुळे पोटनिवडणुकीत मतविभागणीच्या खेळी दोन्हीकडून झाल्या तरी त्यात काही दम नव्हता. थेट आवताडे विरुद्ध नव्हे तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला होता. त्यामुळे ही स्थानिक लढाई असली तरी राज्य सरकार विरुद्ध विरोधक असे प्रचारात पंढरपूरचे मैदान रंगले. 

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारसभा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तर उमेदवार समाधान आवताडे यांच्या खांद्याला खांदा लावून आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रचाराची धूरा सांभाळली. खा. रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी निवडणुकीत महत्वपुर्ण भूमिका निभावली. 

भगीरथ भालके यांच्याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गनिमी कावा करीत फोडाफोडीचे राजकारण करीत परिचारक समर्थक कल्याणराव काळे यांना गळाला लावत भाजपला धक्का दिला. त्यासोबतच अनेक मोहरे गळाला लावले. मात्र, त्याचा मतांच्या रुपात फारसा फायदा झाला असल्याने दिसून आले नाही. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे, ना. धनंजय मुंडे, आ. संजय मामा शिंदे, आ. प्रणिती शिंदे, आ. गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीची ताकद प्रचारात दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप महायुतीच्या प्रचाराची व्यूहरचना आणि त्यादृष्टीने झालेले सोशल इंजिनिअरिंग साहजिकच मजबूत होत गेले. त्यामुळे महाविकास आघाडीचा बोलबाला होत राहिला तरी भाजप ‘समाधान’रूपी अंडरकरंट सर्वच स्तरावर पोहोचला.यातून मतांचे भाजपकडे मतांची बेरीज वाढत गेली, तर महाविकास आघाडीच्या मतांचे ध्रुवीकरण झाले.

स्व. आ. भारत भालके यांना मानणारी 35 गावे भालके यांना चांगले मताधिक्य देतील, असा विश्वास भालके  व राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांना होता. मात्र, पाच ते सहा गावे वगळता 35 गावातून समाधान आवताडे यांना चांगली मते मिळाली. जोडीला 10-12 वर्षापासून या भागातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. एकूणच याचीही सल भाजपने इनकॅश केली. एकूणच या सर्वांची बेरीज सहानुभुतीला बाजूला सारत आवताडे यांनी विजयश्रीची माळ गळ्यात घालण्यापर्यंत घेऊन गेली.