Sat, Oct 31, 2020 14:54होमपेज › Solapur › सोलापूर : रिव्हॉल्वर विक्री करणार्‍यास अटक

सोलापूर : रिव्हॉल्वर विक्री करणार्‍यास अटक

Last Updated: Oct 18 2020 9:00PM
मोहोळ : पुढारी वृत्तसेवा

देशी बनावटीचे रिव्हॉल्वर विक्री करणार्‍या व्यक्तीस सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही घटना शनिवारी मोहोळ-पंढरपूर मार्गावर हॉटेल प्रतापगड येथे पोखरापूर गावच्या शिवारात घडली. भारत गजेंद्र चव्हाण (रा. अमराई मळा, पेनूर, ता. मोहोळ) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत करण्यात आली आहे. मोहोळ न्यायालयाने आरोपीस 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भारत गजेंद्र चव्हाण (रा. पेनूर, ता. मोहोळ) हा स्वतःजवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर काडतूससह बाळगून विक्री करण्याकरीता मोहोळ- पंढरपूर रोडवरील हॉटेल प्रतापगड येथे असल्याची खात्रीशिर बातमी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता. 

यावेळी भारत चव्हाण हा मोटारसायकलवरुन आला असता, पोलिस पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो गाडी न थांबवता पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ विनापरवाना देशी बनावटी धातूचे रिव्हॉल्वरसह 5 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, हे शस्त्र बाळू लिंबा माने आणि पोपट श्रीमंत उघडे (रा. पेनूर, ता. मोहोळ) यांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. 

या प्रकरणी सोलापूर गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे यांच्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांत भारत गजेंद्र चव्हाण, बाळू लिंबा माने, पोपट श्रीमंत उघडे (सर्व रा. पेनूर, ता. मोहोळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी भारत चव्हाण यास न्यायालयात हजर केले असता मोहोळ न्यायालयाने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी बाळू माने आणि पोपट उघडे यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. याचा पुढील तपास सपोनि आशुतोष चव्हाण हे करीत आहेत.

 "