सोलापूर : कोरोनासाठी सिव्हिलमध्ये आणखी १०० बेड 

Last Updated: Jul 10 2020 1:40AM
Responsive image


सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बेडची संख्या  आणखी 100 ने वाढवण्यासाठी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेनुसार सिव्हिल हॉस्पिटलमधील बेडची संख्या आणखी 100 ने वाढू शकते. यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सोलापूर शहरातील बेडची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.  त्याअनुषंगाने  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या ‘बी’ आणि ‘सी’ ब्लॉकला भेट दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, कोरोना विभागप्रमुख डॉ. प्रसाद, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदी उपस्थित होते.

शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘बी’ ब्लॉकची पाहणी केली. सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी इमारतीमध्ये काही किरकोळ फेरबदल करुन कशी  रचना करता येईल याची माहिती जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर  वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी ‘बी’ ब्लॉकमध्ये 20 बेड आयसीयू आणि 80 बेड ऑक्सिजन सुविधेनेयुक्त असावेत, अशा पध्दतीने तयारी करण्याच्या अशा सूचना सिव्हिल प्रशासनाला दिल्या आहेत. डॉ. ठाकूर, डॉ. पुष्पा आगरवाल यांनी आपली मते मांडली. तज्ज्ञ समितीच्या डॉ. शशिकला सांगळे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आयसीएमआरच्या  मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना वॉर्ड तयार करताना काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. या नव्या वॉर्डमध्ये उपचारासाठी सुमारे पाचशे डॉक्टर, कर्मचारी, नर्स यांची आवश्कता आहे, असे डॉ. ऋत्विक जयकर यांनी सांगितले. यामध्ये सुमारे 140 डॉक्टर , 240 नर्सेस आणि 180 सफाई कर्मचारी यांची आवश्यकता आहे, असे  त्यांनी सांगितले. याबाबत आवश्यक त्या कर्मचार्‍यांची सेवा घेण्यात यावी अथवा नव्याने नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या. नव्याने नियुक्ती करण्यासाठीची जाहिरात तत्काळ देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, महानगरपालिकेचे उपायुक्त अजयसिंग पवार, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विद्या टिरणकर, डॉ. सुहास सरवदे, डॉ. अग्रजा चिटणीस-वरेरकर, डॉ.सुरेश कंदले आदी उपस्थित होते.

डॉक्टर, कर्मचार्‍यांची भरती तत्काळ करा

शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी 100 बेड वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या असून याठिकाणी 20 बेड आयसीयू आणि 80 बेड ऑक्सिजनसहित तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जवळपास 140 डॉक्टर, 240 नर्स आणि 180 सफाई कामगारांची गरज भासणार असल्याचे सिव्हिल प्रशासनाने सांगितले. यावर जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ त्यासाठी भरती प्रक्रिया राबवा, अशा सूचना दिल्या आहेत.