Thu, Jul 09, 2020 23:02होमपेज › Solapur › अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सोमवारी अर्ज दाखल करणार

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सोमवारी अर्ज दाखल करणार

Published On: Mar 23 2019 1:16AM | Last Updated: Mar 22 2019 9:13PM
सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोमवारी (दि. 25) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी दिली. अ‍ॅड. आंबेडकर हे रविवार, 24 मार्च रोजी सोलापुरात येणार असून सोमवारी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणार आहेत, असे डॉ. माशाळकर म्हणाले. आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात हे सध्या सोलापुरात तळ ठोकून असून निवडणुकीची रणनीती आखत आहेत. त्यांना स्थानिक नेते सहाय्य करत आहेत. 

अ‍ॅड. आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचा अ‍ॅड. आंबेडकर यांचा निर्णय पक्‍का असून कार्यकर्त्यांनी त्याद‍ृष्टीने तयारीला लागावे, असे स्पष्ट केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी अबदुलपूरकर मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत डॉ. माशाळकर, नाना कदम, निशांत बनसोडे, विक्रांत गायकवाड, प्रा. अंजना गायकवाड आदींनी अ‍ॅड. आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला.

सुजात आंबेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. 

स्थानिक कार्यकर्त्यांच्या जोरावरच निवडणूक लढविली जाईल. भाजपच्या विद्यमान खासदाराच्या कामगिरीबाबत जनतेत नाराजीची भावना दिसून येते. सोलापुरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नावर आवाज उठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सुजात सध्या सोलापुरात तळ ठोकून असून विविध नेत्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत.