Sun, May 31, 2020 12:53होमपेज › Solapur › पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; दोघे जागीच ठार

पुणे-सोलापूर मार्गावर अपघात; दोघे जागीच ठार

Last Updated: Nov 08 2019 11:37AM

संग्रहित छायाचित्रटेंभुर्णी (जि. सोलापूर) : प्रतिनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावर आज (शुक्रवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस उडवले. या  भीषण अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले असून, तिसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात माढा तालुक्यातील शिराळ (टें) गावाच्या हद्दीत महामार्गावर घडला. मृत व जखमी हे लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी असून, ते पुण्याकडे दुचाकीवरून निघाले होते.

आकाश धोंडीराम हरणे (वय.२२ वर्षे), तन्वीर फय्युब पटेल (वय.१८) दोघे रा.औसा जि.लातूर अशी मृत तरुणांची नावे असून, औसा येथील अल्ताफ वसीम वस्ताद (वय.२०) हा जखमी  झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी पासून सहा कि. मी अंतरावरील शिराळ (टें) गावच्या हद्दीत हिरो शाईन (क्र-एम.एच.२४- बी.ए-५२४१) या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीस इंदापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच मृत दोघांचे पार्थिव टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान दोघे जागीच ठार झाल्याने व तिसरा गंभीर जखमी असल्याने तिघांचीही ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले होते. त्यांच्या मोबाईलवर नातेवाईकांनी केलेल्या कॉलमुळे ते तिघे लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी असल्याचे व ते रात्री सोलापूर मार्गे पुणे येथे निघाले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचे नातेवाईक टेंभुर्णी येथे आल्यानंतर मृतांची ओळख पटविण्यात आली.