Wed, Aug 12, 2020 21:11होमपेज › Solapur › क्‍लार्क, शिपाई पदांसाठी पाचशेहून अधिक बोगस विद्यार्थी

क्‍लार्क, शिपाई पदांसाठी पाचशेहून अधिक बोगस विद्यार्थी

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 8:36PMसोलापूर : दीपक होमकर

प्राथमिक शाळेची पटसंख्या पाचशेपेक्षा अधिक असेल तर शाळांना एक लिपीक आणि एक शिपाई पद मंजूर होते. त्यामुळे या दोन पदांच्या नेमणुकीसाठी तब्बल पाचशेपेक्षा अधिक बोगस विद्यार्थी दाखविण्याचा पराक्रम सोलापुरातील अकरा शाळांनी केला. मात्र त्या बोगस विद्यार्थ्यांच्या नावे शाळांना वर्षभर दररोज येणारा पन्नास हजार ग्रॅम तांदूळ खाल्‍ला कोणी, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

2011 मध्ये राज्यभरात 3 ते 5 ऑक्टोबर या तीन दिवसांत एकाच वेळी सर्व शाळांची पटपडताळणी झाली. त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी काही संघटनांनी थेट न्यायालयाकडे केली. 

त्यामुळे न्यायालयाने अशा शाळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या शाळांची यादी राज्य शासनाने पाठविली असून सोलापूर शहरातील 62 शाळांची त्या यादीत नावे आहेत. त्यातील तब्बल आठ शाळांनी पाचशेपेक्षा अधिक पट दाखविला असून त्यातील एकाही शाळेची उपस्थिती पाचशेच्या आसपास नाही.पाचशेच्या पुढे सर्वाधिक उपस्थिती दाखविणार्‍या शाळांमध्ये आंद्र भद्रावती  प्राथमिक शाळेचा सर्वाधिक 934 इतका पट आहे, तर त्यांची प्रत्यक्षातील उपस्थिती 461 इतकी नोंदवली गेली होती. पाचशेच्या पुढे  सर्वात कमी पटसंख्या अमरज्योती विद्यामंदिरने 505 इतकी दाखविली असून त्यांची प्रत्यक्षात उपस्थिती 244 इतकी नोंदवली गेली आहे. 

याशिवाय केवळ 89 इतकी उपस्थिती असतानाही प्रत्यक्षात पटसंख्या मात्र तब्बल 629 इतकी दाखविणार्‍या जीवनज्योती विद्यामंदिरात तर 629 बोगस विद्यार्थी दाखवित सर्वाधिक बोगस विद्यार्थ्यांचा विक्रम केल्याचे कागदोपत्री दिसते.