Fri, Aug 07, 2020 15:40होमपेज › Solapur › हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मंगळवेढा बंद 

हत्याकांडाच्या निषेधार्थ आज मंगळवेढा बंद 

Published On: Jul 03 2018 2:16AM | Last Updated: Jul 03 2018 2:00AMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात साक्री येथे झालेल्या  हत्याकांडात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत तसेच वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठी घरकुलसारख्या योजना देण्याचे आश्‍वासन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवेढा येथे दिले. 

दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणार्‍या या निर्दयी हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी मंगळवेढा बंदचे आवाहन सर्वपक्षीयांच्या वतीने केले आहे. तसेच दुपारी बारा वाजता मारुतीच्या पटांगणात मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजनही करण्यात आले आहे.

नाथ पंथी डवरी गोसावी समाजाच्या खवे आणि मानेवाडी येथील चार भिक्षुकांच्या हत्येनंतर त्यांच्या समाजाच्या सांत्वनासाठी सोमवारी मंगळवेढा येथे ना. देशमुख आले होते. यावेळी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, डवरी समाजाचे नेते मच्छिंद्र भोसले, आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, अशोक माळी  आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी मोबाइलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत ही मदत त्यांच्या वतीने उपस्थित डवरी समाजाच्या लोकांसमोर जाहीर केली.

अधिवेशनात आवाज उठवणार : आ. भालके
दरम्यान, सोमवारी सकाळी आ. भारत भालके यांच्या संपर्क कार्यालयात समाजाच्या शेकडो लोकांनी आ. भालके यांची भेट घेतली. यावेळी आ.भालके यानी भिक्षा मागण्यासाठी जाणार्‍या व्यक्तींकडे ओळखपत्र असतानादेखील याचा विचार न करता त्यांची हत्या केली. या प्रकरणात धुळे पोलिस प्रमुखांशी बोललो असून यातील काही आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध चालूच असल्याचे सांगितले असले तरी वारसांना मदत व नोकरीचे आश्‍वासन सरकारने दिल्याशिवाय उद्याच्या अधिवेशनात  गप्प बसणार नाही असे यांनी सांगितले.

ही अमानुष घटना समजताच मंगळवेढ्यातून रात्री मारुती भोसले, शिवाजी चौगुले, दिगंबर माळवे या तिघांसह मारुती रेड्डी, शहानूर फकीर हे मित्र मृतदेह ताब्यात घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरकडे रवाना झाले. सध्या खवे या गावी पोलिसाशिवाय कोणीच नसून कुटुंबातील कर्त्याची हत्या झाल्यामुळे कुटूंब उघड्यावर पडले आहे.

मंगळवारी मंगळवेढा बंद
दरम्यान माणुसकीला काळीमा फासणार्‍या या निर्दयी हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी मंगळवेढा बंदचे आवाहन समस्त तालुका सर्व पक्षीयांच्यावतीने केले आहे. तसेच दुपारी बारा वाजता मारुतीच्या पटांगणात श्रद्धांजली शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे .

जिल्ह्यात संतापाची लाट
या हत्याकांडांचे वृत्त समजताच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी या प्रकाराची चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. विविध पक्ष, संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. परिसरातील नागरिक मृतांचे पार्थिव कधी आणण्यात येणार याची प्रतीक्षा करीत आहेत.