Tue, Jul 07, 2020 17:46होमपेज › Solapur › माढ्यात पंढरपूरची 42 गावे ठरणार निर्णायक

माढ्यात पंढरपूरची 42 गावे ठरणार निर्णायक

Published On: Aug 26 2019 1:51AM | Last Updated: Aug 25 2019 9:10PM

संग्रहित छायाचित्रपंढरपूर : प्रतिनिधी

माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील 42 गावांवर आ. परिचारक, आ. भालके, राजूबापू पाटील, कल्याणराव काळे यांचा प्रभाव असून या नेत्यांची भूमिका काय राहणार यावर 42 गावांचा कल असणार आहे. त्यामुळे माढा विधानसभा निवडणुकीत ही 42 गावे निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात  पंढरपूर तालुक्यातील 42 गावे समाविष्ट आहेत. यामध्ये भोसे, करकंब, रोपळे हे तीन जि.प. गट आणि 6 पंचायत समिती गणांचा समावेश असून सुमारे 1 लाखांवर मतदार या 42 गावांमधील आहेत. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे  या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी त्यांना या 42 गावांत आ. परिचारक गटाचे मोठे सहकार्य झालेले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपासून आ. परिचारक गटाने आ. शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. परिचारक सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांनी लोकसभेला भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता. त्याव्यतिरिक्त विधानसभेला आ. शिंदे यांना आ. भालके, राजूबापू पाटील, काळे गटाचे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्या परिचारक यांच्यासह कल्याणराव काळे हे भाजपसोबतआहेत. 
आ. भारत भालके हेसुद्धा महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 42 गावांतील भालके समर्थक मतदारांची कुमकसुद्धा महायुतीच्या उमेदवारास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आ. बबनदादा शिंदे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. 

माढा लोकसभा निवडणुकीत या भागात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना सुमारे 6 हजारांचे मताधिक्य मिळाले असले तरी त्यामध्ये आ. भालके आणि राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांचा मोठा वाटा आहे.  हे लक्षात घेता  विधानसभा निवडणुकीत भालके आणि राजूबापू पाटील यांची मदत ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहील त्याला विजयाची अधिक संधी राहण्याची शक्यता आहे. 
या 42 गावांत आ. परिचारक गटाच्या खालोखाल राजूबापू पाटील यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचा जो एकमेव गट मिळाला तो राजूबापू पाटील यांच्यामुळेच मिळाला आहे. त्यामुळे राजूबापू पाटील यांची ताकद या भागात दुर्लक्षून चालणार नाही. सध्या ते राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य असले तरी त्यांचे गेल्या 10 वर्षांत आ. शिंदे यांच्यासोबत सूत जुळलेले नाही. लोकसभा  निवडणुकीत पक्षादेश म्हणून राजूबापू  पाटील यांनी संजय शिंदे यांचा प्रचार केला आणि आपल्या भागातून मताधिक्य मिळवून दिले. 

विधानसभा निवडणुकीत आ. शिंदे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. ते शिवसेनेत जाणार, भाजपात जाणार अशा चर्चांचे पेव फुटले असले तरी अद्यापही शिंदे यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे आजतरी मानले जाते. माढा तालुक्यातील सर्व  आ. शिंदे समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांच्याविरोधात काम केल्यामुळे माढा तालुक्यातील गावांतून शिंदे यांना अत्यल्प मताधिक्य मिळाले होते. माळशिरस तालुक्याच्या महाळुंग मंडलातील गावे आ. शिंदे यांच्याविरोधात जाणार आहेत, हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच स्पष्ट झाले आहे.  माढा तालुक्यातील विरोधकांची आघाडी अजूनही मजबूत असून त्यांच्या आ. शिंदे विरोधासाठी जोरबैठका सुरू झालेल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातून 42 गावांतील सक्षम उमेदवार दिला आणि त्या उमेदवाराला माढा तालुक्यातील सर्वपक्षीय शिंदे विरोधकांची ताकद मिळाली तर आ. शिंदे यांना परत विधानसभेत जाणे जीकिरीचे ठरणार आहे.  2014 प्रमाणेच पुन्हा एकदा आ. शिंदे यांना पंढरपूर तालुक्याच्या 42 गावांतूनच मोठे आव्हान मिळणार असून निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

आ. शिंदे यांच्यापुढे राहणार आव्हान

सध्या परिचारक यांच्यासह सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे भाजपसोबत आहेत. आ. भारत भालके हेसुद्धा महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 42 गावांतील भालके समर्थक मतदारांची कुमकही महायुतीच्या उमेदवारास मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आ. शिंदे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावांतील सक्षम उमेदवार दिला आणि त्या उमेदवाराला माढा तालुक्यातील सर्वपक्षीय शिंदे विरोधकांची ताकद मिळाली तर आ. शिंदे यांना परत विधानसभेत जाणे जीकिरीचे ठरणार आहे.