Thu, Sep 24, 2020 16:25होमपेज › Solapur › १५ लाखांची रोकड एस.टी.तून लंपास

१५ लाखांची रोकड एस.टी.तून लंपास

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:21PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर एस. टी. स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून चोरट्याने एस. टी. महामंडळाची 14 लाख 76 हजार 116 रुपयांची रोख रक्‍कम असलेली बॅग चोरून नेली. ही घटना शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत एस.टी. महामंडळातील कॅशियर विवेक भास्कर देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विवेक देशपांडे हे एस.टी. महामंडळात कॅशियर म्हणून कामास आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एस. टी. स्थानकातील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या कॅशियर रूममध्ये सर्व वाहकांनी जमा केलेली रक्‍कम बँकेत भरणा करण्यासाठी देशपांडे हे एकूण 14 लाख 76 हजार 116 रुपयांची रोख रक्‍कम एका बॅगेत ठेऊन एस.टी. बसमधून जाणार   होते.  जिन्यावरून खाली आल्यानंतर समोर उभ्या असलेल्या रिकाम्या एस.टी. बसमध्ये (एमएच 40 एन 9500) देशपांडे यांनी बॅग ठेवली. ही बॅग एस.टी. बसमध्ये ठेऊन ते चालक आजमोद्दीन तालीकोटी याची वाट पहात बसच्या दरवाजाजवळ खाली थांबले होते. एस.टी. बसचा चालक तालीकोटी आल्यानंतर देशपांडे हे चालकासह एस.टी. बसमध्ये आले असता त्यांना रोख रक्‍कम असलेली बॅग नसल्याचे दिसून आले. 

एस.टी. बसमध्ये बॅग ठेऊन देशपांडे हे प्रवासी चढण्याच्या दरवाजाजवळ थांबून होते. त्यामुळे अज्ञात चोरट्याने चालक जिथून एस. टी. बसमध्ये चढतो तेथील दरवाजातून येऊन एस. टी. बसमधील  रोख रकमेची बॅग चोरुन नेल्याचा संशय देशपांडे यांनी व्यक्‍त केला. रोकड चोरीस गेल्याची माहिती समजतार बसस्थानक  आवारात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्‍त अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी एस.टी. स्थानकात धाव घेतली व तपासास सुरुवात केली. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.