Thu, Jan 28, 2021 08:19होमपेज › Solapur › आठ कारखान्यांकडे सॉफ्ट लोनचे १३३ कोटी थकीत

आठ कारखान्यांकडे सॉफ्ट लोनचे १३३ कोटी थकीत

Last Updated: Feb 15 2020 12:56AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील साखर कारखानदारांना 2015 साली साखरेचे दर पडल्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपयांचे सॉफ्ट लोन दिले होते. परंतु, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांना देण्यात येणारे व्याज दिले नाही. परिणामी, जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांकडे 133 कोटी 89 लाख रुपयांचे सॉफ्ट लोन थकले असून याची माहिती साखर आयुक्‍तांनी मागविली आहे.

सोलापूरसह राज्यात 2015 साली साखरेला किंमत नव्हती. उसाचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे साखरेच्या दरामध्ये मोठी घट झाली होती. केंद्र शासनाने साखर कारखानदारांच्या अडचणी लक्षात घेऊन देशातील साखर कारखानदारांना 6 हजार कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन दिले होते. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यालादेखील कोट्यवधी रुपयांचे सॉफ्ट लोन देण्यात आले होते. या सॉफ्ट लोनची परतफेड करताना पहिल्या वर्षाचे व्याज केंद्र सरकार भरणार होते, तर उर्वरित वर्षांचे व्याज राज्य सरकार भरणार होते. मात्र, सुरुवातीला मुद्दल व व्याज साखर कारखानदारांनीच भरावे, असे ठरले. ठरल्याप्रमाणे साखर कारखानदारांनी मुद्दल आणि व्याज भरले, परंतु त्यानंतरही राज्य सरकारने साखर कारखान्याला दिलेल्या सॉफ्ट लोनचे व्याजच दिले नाही. परिणामी मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखानदार मुद्दल आणि व्याजदेखील भरत आहेत. मात्र, शासनाकडूनच व्याजाची येणेबाकी असल्यामुळे साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे.

त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सासवड माळी शुगर 5 कोटी 68 लाख, सिद्धेश्‍वर साखर कारखाना 4 कोटी 55 लाख, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना पंढरपूर 25 कोटी 76 लाख, भीमा सहकारी साखर कारखाना 48 कोटी, विठ्ठल कॉर्पोरेशन 1 कोटी 89 लाख, विठ्ठल कॉर्पोरेशन 1 लाख, युटोपियन शुगर 9 कोटी 58 लाख, सहकारमहर्षी 38 कोटी 53 लाख रुपये, असे 133 कोटी 90 लाख रुपयांचे सॉफ्ट लोन थकीत आहे. काही साखर कारखान्यांनी थकीत असलेले सॉफ्ट लोन आपल्याजवळील पैशांनी पूर्ण भरले आहे. परंतु, शासनाने सुरूवातीला सॉफ्ट लोनचे व्याज दिले. नंतर व्याजच दिले नसल्यामुळे घेतलेल्या सॉफ्ट लोनची रक्‍कम शासनाकडे साखर कारखानदारांनी भरली नाही. त्यामुळे साखर कारखानदारांकडून सॉफ्ट लोनची काही रक्‍कम येणे असली तरी कारखानदारांनाही शासनाकडून व्याजाची रक्‍कम येणे आहे.

केंद्र शासनाने साखर कारखानदारांना सॉफ्ट लोन दिले; परंतु त्या व्याजाची रक्‍कम राज्य शासनाने कारखान्यांना दिलीच नाही. त्यामुळे अगोदर शासनाने साखर कारखानदारांना व्याजाची रक्‍कम द्यावी.
- समीर सलगर, 
व्यवस्थापक, सिद्धेश्‍वर साखर कारखाना