पंढरपूर : फडाचा कारभार प्रशासनाने ताब्यात घ्यावा; प्रमुखांची मागणी 

Last Updated: Jan 17 2020 7:48PM
Responsive image


पंढरपूर : प्रतिनिधी

येथील प्रतिष्ठीत अशा गुरू बाबासाहेब आजरेकर फडाच्या विश्वस्तांनी कायदा आणि सुव्यस्थेचे कारण सांगून आपल्या फडावर प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आमच्या जीविताला धोका असल्याने आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. 

नुकतेच येथील कराडकर मठाच्या मठाधिपतीपदावरून विद्यमान मठाधिपतींचा खून झाल्यानंतर वारकरी संप्रदायात अस्वस्थता पसरली आहे. यापूर्वीच अनेक मठ आणि फडामध्ये वाद सुरू आहेत. तर काही प्रतिष्ठीत मठामध्ये यापूर्वी भांडणे सुद्धा झालेली आहे. तर अनेक मठ आणि फडांचे वाद न्यायालयात, धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. अशाच वादातून मठाधिपतींचा खून झाला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील मोठा फड अशी ओळख असलेल्या गुरू बाबासाहेब आजरेकर फडात ही विश्वस्त पदावरून वाद सुरू आहेत. याबाबत फडाच्या विश्वस्तांनी पोलिसात धाव घेतली आहे. तसेच २० डिसेंबर २०१८ रोजी पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलनही केलेले आहे. मात्र तरीही शहर पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत आजरेकर फडाचे विश्वस्त किसन आप्पासाहेब माने (रा. शिरोळ, जि कोल्हापूर) यांनी फडावर प्रशासक नेमून कारभार शासनाने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. 

वाचा : वाशिम जिल्हा परिषदेत काँग्रेसमध्ये बंडखोरी, राष्ट्रवादीचा फायदा

फडामध्ये वाद सुरू असून किसन आप्पासाहेब माने हे फड प्रमुख म्हणून फडावर किर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम करत असतात. मात्र हरिदास रामभाऊ बोराटे आणि इतर त्यांना मारण्याची धमकी देत असून गादीवर बसू देत नाहीत. त्यामुळे फडावर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माने यांनी फडाचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात दिला जावा अशी मागणी केली आहे. अन्यथा शहर पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.