Sat, Oct 24, 2020 23:00होमपेज › Satara › कोयना धरणातून आजपासून विसर्ग

कोयना धरणातून आजपासून विसर्ग

Last Updated: Aug 13 2020 11:44PM
पाटण : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 50 हजार क्युसेक्सपाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा 80 टीएमसी इतका झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळेच वीजनिर्मिती करून धरणाच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणांतर्गत विभागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या येथे प्रतिसेकंद सरासरी 50 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. याशिवाय धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता व सध्याचा साठा याचा विचार लक्षात घेऊन जर पाऊस व पाण्याची आवकही अशीच राहिली, तर धरणातून वीजनिर्मिती करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार शुक्रवार, 14 ऑगस्टपासून सकाळी 11 वाजता धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. याशिवाय त्यानंतरही आवक वाढल्यास धरण परिचालन सूचीप्रमाणे लवकरच धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातून विनावापर पाणी सोडण्यात येणार आहे. गुरूवारी रात्री आठ वाजता धरणाची पाणी उंची 2141.8 फूट व पाणीसाठा 80.45 टीएमसी इतका झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वेकडे कोयना तसेच कृष्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. नदीकाठच्या शेती पाणी योजना वीज मोटारी, इंजिन, शेती अवजारे अथवा अन्य साहित्य पशुधन यांचच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

 "