Mon, Jul 13, 2020 07:35होमपेज › Satara › लोकसभेला सहा, तर विधानसभेला 42 अर्ज

लोकसभेला सहा, तर विधानसभेला 42 अर्ज

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 11:40PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी  6 जणांनी उमेदवारी दाखल केली, तर  जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांतून गुरुवारी एकूण 42 जणांनी निवडणूक आखाड्यात उडी घेतली. आता  शुक्रवारी अखेरचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. दरम्यान, निवडणुकीत रंगत येऊ लागली असून जिल्ह्यातील वातावरण ढवळून गेले आहे. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक तसेच जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत राजकीय ज्वर चढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी   पक्षाच्या ‘ए’ व ‘बी’ फॉर्मची फार वाट न पाहता उमेदवार अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करु लागले आहेत. विराट रॅली आणि शक्‍तिप्रदर्शनांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळले आहे. 

गुरूवारी माजी राज्यापाल श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 2  उमेदवारी अर्ज सादर केले. पुरुषोत्‍तम जाधव (खंडाळा)  व शिवाजी भोसले (रा. भोसले मळा, करंजे) यांनी प्रत्येकी 1  अपक्ष अर्ज भरले. दिपक ऊर्फ व्यंकटेश्‍वर महास्वामीजी (रा. आंबेडकर नगर, बेलूर जि. सांगली) यांनी हिंदुस्थान जनता पार्टी  व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातून प्रत्येकी 1 असे अर्ज सादर केले.  लोकसभा पोट निवडणुकीसाठी एकूण 6 उमेदवारांनी 9 अर्ज दाखल केले. 

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही इच्छुकांमध्ये भारी उत्साह दिसला. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी इच्छुकांनी सातारा प्रांताधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. दिपक साहेबराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन उमेदवारी अर्ज सादर केले.अभिजीत बिचुकले, शंभूराज भोसले, सागर भिसे यांनी प्रत्येक 1 अपक्ष उमेदवारी अर्ज भरले असून दिवसभरात एकूण 4 उमेदवारांनी 5 अर्ज दाखल केले आहेत. उमेवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना इच्छुकांनी मोठ्या प्रमाणवर अर्ज नेले. गुरूवारी  फलटण विधानसभा मतदार संघात 3, वाई-6, कोरेगाव-3, माण -6, कराड (उत्तर) 1, कराड (दक्षिण)-13, पाटण-5 तर सातारा 5 असे एकूण आज 8 मतदारसंघात एकूण 42 नामनिर्देशनपत्रे दाखल झालेली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी दिली.

आज अखेरचा दिवस असल्याने मांदियाळी

उमेदवारी अर्ज दाखल करण्?याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी 3 पर्यंत मुदत आहे. वेळ संपण्यापूर्वी संबंधित इच्छुकउमेदवार अर्जासह संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर उपस्थित असणे गरजेचे आहे. आजअखेरच्या दिवशी कोरेगावमधून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई, कराड उत्तरमधून अपक्ष मनोजदादा घोरपडे, कराड दक्षिणमधून  अ‍ॅड. उदयसिंह पाटील, माणमधून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर गोरे, आमचं ठरलंयचे अनिल देसाई, राष्ट्रवादीतून प्रभाकर देशमुख, वाईतून भाजपचे मदनदादा भोसले, सेनेचे बंडखोर पुरुषोत्तम जाधव, फलटणमधून महायुतीतर्फे दिगंबर आगवणे, राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण, अपक्ष स्वप्नाली शिंदे,  यासह सातार्‍यातून अभिजित बिचुकले, वंचित आघाडीचे अशोकराव देवकात व इतर इच्छुक उमेदवार मैदानात उतरणार आहेत.