Sat, Jul 04, 2020 03:38होमपेज › Satara › काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांची आता अग्निपरीक्षा

काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांची आता अग्निपरीक्षा

Published On: May 27 2019 11:56PM | Last Updated: May 29 2019 2:12AM
सातारा : हरीष पाटणे 

सातारा लोकसभा मतदारसंघात भलेही मोदी लाट मोठ्या प्रमाणात दिसली नाही, तरीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची मोठी अग्निपरीक्षा आहे. लोकसभेपाठापोठ लगोलगच विधानसभा निवडणुका येत असल्याने व राज्यात मोदी लाट तशीच राहिल्याने सातारा जिल्ह्यात सेना-भाजप या महायुतीतून इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठी ऊर्जा मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित आघाडीला मतदान झाले असल्याने अटीतटीची लढत जिथे आहे तिथे ‘वंचित’ची जादू चालणार आहे.

देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीत सुप्तावस्थेत असलेल्या मोदी लाटेचा करिष्मा दिसला. सातारा लोकसभा मतदारसंघालगतच्या माढा, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, मावळ अशा मतदारसंघांमध्येही महायुतीचे उमेदवार निवडून आले. सातार्‍यामध्ये मात्र राष्ट्रवादीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे व बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आले. राष्ट्रवादीसाठी एवढीच काय ती जमेची बाजू. सातार्‍यामध्ये मोदी लाट फार मोठ्या प्रमाणात जरी दिसत नसली, तरी ‘वंचित’ची मते धरून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधात 5 लाखांच्या आसपास  मते गेली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही विरोधात गेलेली मते 4 लाखांच्या घरातच होती. मात्र, ती विखुरलेली होती. या खेपेला मात्र महायुतीच्या पारड्यात हे एक गठ्ठा मतदान दिसत आहे. सातार्‍यात मोदी लाटेचा प्रभाव दिसला नाही, त्याला उदयनराजे हा वैयक्तिक फॅक्टरही कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे लोकसभेला जी मोदी लाट सातार्‍यात जाणवली नाही ती विधानसभेला जाणवणारच नाही, असे अजिबात नाही. 

सातारा जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. त्यापैकी सातारा विधानसभा मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी व काँग्रेसला 1 लाख 14 हजार 704, तर महायुतीला 69 हजार 747 एवढी मते मिळाली आहेत. विशेषत:, सेना-भाजपच्या निष्ठावंतांनी जावलीतून नरेंद्र पाटील यांना मताधिक्य मिळवून देताना जीवाचे रान केले. त्याला राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांचीही साथ मिळाली. सद्यस्थितीत दीपक पवार अथवा अमित कदम ही नावे भाजपमधून चर्चेत आहेत तर विद्यमान आमदार शिवेंद्रराजेंनी भाजपमध्ये जावे, असा आग्रह त्यांच्या सातारा व जावली तालुक्यातील काही समर्थकांनी धरला आहे. आ. शिवेंद्रराजे कधीही आपल्या मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत. त्यामुळे ते कोणता निर्णय घेतील त्यावर या मतदार संघाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, आघाडी व महायुती यांच्यामधील लोकसभा निवडणुकीतील फरक विधानसभेला मात्र काठावर येईल अशी परिस्थिती आहे. 

कोरेगाव विधानसभा मतदार संघात आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी तारेवरची कसरत आहे. मुळातच लोकसभेपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांना अनेक ठिकाणी धक्के बसले. लोकसभेला मात्र त्यांनी गांभिर्याने ग्राऊंड लेव्हलवर जावून काम केले. त्याचवेळी भाजपचे महेश शिंदे यानी खटावपासून सातार्‍यापर्यंत सगळीकडे वैयक्तिक प्रचार यंत्रणा राबवली आणि लोकसभेच्या निवडणुकीतच विधानसभेची तयारी करून घेतली. महायुतीच्या जागा वाटपात कोरेगाव शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून कोरेगावात दत्ताजी बर्गे, रणजित भोसले असे इच्छुक आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांशी असलेले महेश शिंदे यांचे संबंध लक्षात घेता व या मतदार संघात आ. शशिकांत शिंदे यांना टक्कर देणारा ताकदीचा उमेदवार म्हणून महेश शिंदे भाजपला जागा सोडवून घेवू शकतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला 1 लाख 516 तर महायुतीला 67  हजार 89 मते मिळाली आहेत. या मतदार संघात वंचित आघाडीला 5 हजार 985 एवढी मते आहेत. कोरेगाव विधानसभा  मतदार संघावर खा. उदयनराजेंचा वैयक्तिक प्रभावही दिसला.  विधानसभेच्या निवडणुकीत कोरेगावात अंतर्गत बंडाळीमुळे आ. शशिकांत शिंदे यांना कसरत करावी लागणार आहे. 

वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील यांच्यासाठीही निवडणूक सोपी राहिलेली नाही. हा मतदार संघ जागा वाटपात शिवसेनेकडे  आहे. किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले भाजपात आहेत. त्याचवेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशीही त्यांचे सख्य आहे.  एक तर विधानसभेचा मतदार संघ भाजप मदनदादांसाठी शिवसेनेकडून मागून घेवू शकतो किंवा  नरेंद्र पाटील जसे भाजपने शिवसेनेच्या ओट्यात  टाकले तसे मदनदादांनाही शिवसेनेकडून लढायला लावू शकते. या मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीला उदयनराजेंना 1 लाख 6 हजार 754 तर नरेंद्र पाटील यांना 74 हजार 542 अशी मते आहेत. वाई, खंडाळा, महाबळेश्‍वरात मदनदादांना मानणार्‍या अनेक समर्थकांनी ‘दादा, विधानसभेला तुमचं करू, आता महाराजांचं काम करु द्या’, असे सांगून उदयनराजेंना मतदान केले आहे.  शिवाय वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर, शिरवळ व लोणंद या शहरांमध्ये राष्ट्रवादी व महायुती यांची मते नेक टू नेक  आहेत. त्यामुळे आघाडीचे उमेदवार असणार्‍या आ. मकरंद पाटील यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे तर महायुतीला मिळालेली 74 हजार 542 मते मदनदादांसाठी उर्जा देणारी ठरणार आहेत. संपूर्ण लोकसभा मतदार संघात वंचित आघाडीला सर्वाधिक 8 हजार 963 मते वाई मतदार संघात मिळाली आहेत. विधानसभेची निवडणूक काट्याची होणार असल्याने या मतांना महत्व येणार आहे. 

कराड उत्तर विधासभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून आ. बाळासाहेब पाटील हे उमेदवार राहतील. हा मतदार संघ शिवसेनेकडे असल्याने नितीन बानुगडे-पाटील अथवा ते सांगतील तो उमेदवार निवडणूक रिंगणात राहू शकतो. मात्र, भाजपने या मतदार संघात प्रचंड लक्ष घातले आहे. मनोजदादा घोरपडे यांनी आपला वैयक्तिक संपर्क वाढवला असून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सर्वाधिक दौरे या मतदार संघात होत असतात. त्यामुळे महायुतीच्या तिकिट वाटपात या मतदार संघाची आदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी धैर्यशील कदम यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीला दुसर्‍या क्रमांकाची मते धैर्यशील कदम यांनी घेतली आहेत. त्यामुळे कदम निवडणूक लढणार पण कोणत्या पक्षातून? यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.  लोकसभा निवडणुकीत  या मतदार संघात आ. बाळासाहेब पाटील व धैर्यशील कदम यांनी स्वतंत्रपणे काम करत उदयनराजेंना सुमारे 39 हजाराचे मताधिक्य दिले आहे. राष्ट्रवादीला 1 लाख 04 हजार 37  तर महायुतीला  65 हजार 474 मते मिळाली आहेत. शिवाय वंचित आघाडीला  7 हजार 120 एवढी मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीची वाढलेली मते राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक आमदाराने आपापल्या विधानसभा मतदार संघात  आपले प्राबल्य दाखवून दिले आहे. केवळ कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना अन्य आमदारांच्या तुलनेत आपले प्राबल्य दाखवता आले नाही. फक्त गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आघाडीच्या उमेदवाराला जादा मते मिळवून देण्यात व महायुतीचे मोठे लीड रोखण्यात मात्र आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. आनंदराव पाटील तसेच राष्ट्रवादीची दक्षिणची फळी यशस्वी ठरली हीच काय समाधानाची बाब. लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिणमधून आघाडीला 81 हजार 829 तर महायुतीला 86 हजार 657 एवढी मते मिळाली आहेत. याशिवाय वंचित आघाडीला 6 हजार 774 मते आहेत. महायुतीला मिळालेल्या या यशामध्ये डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, विक्रम पावस्कर यांचा जसा वाटा आहे तसाच माजी मंत्री विलासराव पाटील  उंडाळकर यांच्या गटानेही महायुतीला मदत केल्याचे आकडेवारी सांगते. या मतदार संघावर शिवसेनेऐवजी भाजप दावा सांगणार हेही निश्‍चित आहे. डॉ. अतुल भोसले यांची मुख्यमंत्र्यांशी असलेली सलगी त्यांना मतदार संघांसह तिकिट मिळवून देण्यात यशस्वी ठरू शकते.  उंडाळकर गट नेमकी काय भूमिका घेईल यावरच मतदारसंघाची राजकीय समीकरणे ठरणार आहेत. त्यामुळे दक्षिणची लढाई यावेळेला गेल्या खेपेपेक्षाही अटीतटीची होणार आहे. 

पाटण विधानसभा मतदार संघात विद्यमान आ. शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांच्यात सरळ लढत होईल. लोकसभा निवडणुकीत आ. शंभूराज देसाई यांनी 18 हजाराचे लीड महायुतीला मिळवून दिल्याने देसाईंची गाडी सुसाट आहे.  जागा वाटपाचाही तिढा देसाईंना भंडावणारा नाही. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम त्यांनी करून घेतली आहे.  मोदी लाट, मुख्यमंत्र्यांचा प्रभाव  आणि वैयक्तिक आ. शंभूराज देसाई यांचा करिष्मा असल्याने या मतदार संघात सत्यजितसिंह पाटणकर यांना खूप काम करावे लागणार आहे. खा. उदयनराजेंनी सत्यजितसिंहांना मदत केली तर ही लढाई पुन्हा एकदा अटीतटीची होवू शकते. सातारा लोकसभा मतदार संघातही उदयनराजेंमुळे मोदी लाट थोपवली गेली आहे. विधानसभेला ती तशीच  थोपवली जाईल असे नाही त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघांतील आमदारांसाठी यापुढे अग्निपरीक्षा ठरणार आहे.