Tue, Jul 14, 2020 01:50होमपेज › Satara › तुम्ही एवढं पळवलं की दोघांची पळण्याची हौसच फिटली : उदयनराजे

तुम्ही एवढं पळवलं की दोघांची पळण्याची हौसच फिटली : उदयनराजे

Published On: Jan 27 2019 2:03PM | Last Updated: Jan 27 2019 2:24PM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काल सातार्‍यात येवून गेले काय, आणि लगेचच सातारच्या राजघराण्याच्या भाऊबंदकीत गोडी निर्माण झाली. गेल्या काही महिन्यांपूर्वी एकमेकांची नजरानजर टाळण्यासाठी आटापिटा करणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे  ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू लोकसभा-विधानसभेच्या माळा’ असा सूर आळवला जात आहे. आज यवतेश्‍वर घाटात रनिंग करणाऱ्या विविध स्पर्धकांशी त्यांनी बातचीत केली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी तुम्ही एवढं पळवले की दोघांचे पळण्याची आता हाऊसच फिटली आहे, अशी मार्मिक टिप्पणी केली. दरम्यान दोन्ही राजांनी हातात हात घालून ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवली.

नगरपालिकेच्या निवडणुकीत सातार्‍याच्या राजघराण्याचे ऐतिहासिक मनोमिलन तुटले. नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे यांचा थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे हा पराभव आमदार शिवेंद्रराजेंच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आमदार-खासदारांमध्ये टोकाचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर सुरूची राडा आणि आनेवाडी प्रकरण झाल्यानंतर हे वितुष्ट आणखी वाढले. त्यातच दारू दुकानाच्या मुद्द्यावरून दोन्ही राजे सामोरा समोर आले होते.

आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या आहेत. सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादीसह कॉंग्रेसचीही जिल्ह्यात वाताहत झाली आहे.  असे असताना रुसवे-फुगवे, तंटे-बिखेडे विसरुन हातात हात घालून आगामी निवडणुका लढवल्या तरच भाजपचा वारु थोपवता येणार आहे, हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना माहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासदार पवारांचे सातारा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सातारा दौरे वाढले आहेत. यानिमित्ताने ते जिल्ह्यातील लोकसभेचा व विधानसभेची गोळाबेरीज करत असतात.  त्यामुळे पवारांनी ‘एकला चलो रे’ म्हणणार्‍या उदयनराजेंचा हात पुन्हा हातात घेत थोडं सबुरीनं घ्या, डोकं शांत ठेवा, असा सल्ला काल झालेल्या कार्यक्रमात दिला. 

दरम्यान, कालपासून विविध कार्यक्रमात हातात हात घालून फिरणार्‍या सातारच्या आमदार- खासदारांनी आज यवतेश्‍वर घाटातील प्रकृती रिसॉर्ट येथे सातारा रनर्स फौंडेशनच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. खा. उदयनराजे भोसले व आ शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत ‘अब हम दो नहीं, एकही हैं’ अशी खूण दाखवत किमान येणार्‍या निवडणुकीत तरी तेरी मेरी यारी, ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ असे म्हणत ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू लोकसभा-विधानसभेच्या माळा,' असे संकेत दिले. 

वाचा : उदयनराजे डोकं शांत ठेवा  : शरद पवार 

वाचा : प्रियांका गांधींना 'हा' धोकादायक आजार; स्वामींचा दावा