होमपेज › Satara › इधर घड़ीकी ‘सेटिंग’; उधर दिलसे ‘डेटिंग’

इधर घड़ीकी ‘सेटिंग’; उधर दिलसे ‘डेटिंग’

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 11 2018 12:35AMसातारा : हरीष पाटणे

सातार्‍यात बुधवारी तशा बर्‍याच कलागती झाल्या. बटणालाही कधी हात न लावणार्‍या साहेबांनी टराटरा कॉलर उडवली. साहेबांनीही कॉलर उडवल्याचे ऐकताच विश्रामगृहावर घटनेचा आदमास घेत बसलेली ‘छाती’ दाणकन फुगली. शाब्बास पठ्ठे! म्हणत त्यांनी डायरेक्ट ‘लोकसभे’त उडी मारल्यासारखा पवित्रा घेतला. इकडे ‘रयत’च्याच इमारतीत एका बाजूला बसलेल्या अजितदादांनी शशिकांत शिंदेंनाही जोरदार टाळी दिली. पण दादांनाही डोळा मारत शशिकांत शिंदेंनी  ‘अगायाऽयाऽया’ करत जोरात हात चोळला. (ही टाळी परवडणारी नाही याचा अनुभव  कोरेगावच्या  साहेबांना यापूर्वीच आहे म्हणे!). त्यातच थोरल्या साहेबांना पत्रकारांनीच ‘अडकवल्याचे’ लक्षात आल्यानंतर  बाहेर तुंबून बसलेल्या अनेकांना एव्हाना घाम फुटला होता. मंगळवारी दुपारी शरद पवार आल्यापासून बुधवारी ते जाईपर्यंत पूर्णवेळ त्यांच्यासोबत राहून शिवेंद्रबाबांनी तर मोक्यावर चौका मारुन घेतला. सुप्रियाताईंच्या सेल्फीत अजितदादांच्या मांडीला मांडी लावून शिवेंद्रबाबा रेटून आणि खेटून विसावल्याचा फोटो गोडोलीपासून पेढ्याच्या भैरोबापर्यंत जोरदार व्हायरल झाला. तेवढं पुरलं नाही म्हणून की काय  ग्राहक संघाच्या कार्यक्रमात  अजितदादांच्या शेजारीच घड्याळाला कचाचा चावी देत शिवेंद्रबाबांनी घड्याळाचे जोरदार ‘सेटींग’ करुन घेतले. साहेब व दादांनी पूर्णवेळ बाबांना बरोबर घेतल्याने बाबांचे कार्यकर्ते दिवसभर ‘बाबा लगीन, ढिंच्यँग-डिच्यँग’ करत  सुसाट होते. तिकडे मुंबईत मात्र दुसरीच घालमेल सुरु होती. राजधानी महोत्सवाच्या ‘अक्षदा’ घेऊन छत्रपती उदयनराजे फडणवीसांच्या दरबारी जावून बसले होते. साहेबांनी सातार्‍यात येऊन कॉलर  फडकावल्याचा राग महाराजांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कानापर्यंत धाडला. लगोलग ‘पक्षबिक्ष गेला खड्ड्यात, नाम तो सुना ही होगा’ अशा पोस्ट राजे समर्थकांनी व्हायरल केल्या. दोन्ही बाजूने अशी ‘नेटा-नेटी’ सुरु झाली की आमच्या कानठळ्या बसतील एवढा ठो-ठो आवाज येऊ लागला. पक्षाचे साहेब सातार्‍यात असतात आणि आपले खासदार मुंबईत भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांबरोबर ‘डेटींग’ करत आहेत, अशा कागाळ्या साहेबांपर्यंत पोहोचवणार्‍यांनी  पोहोचवल्याच. कुणी म्हणाला उदयनराजेंचे नेहमीचे प्रेशर टॅक्टीज आहे, तर कुणी म्हणाला ‘ते’ निघाले भाजपमध्ये. बोलणार्‍यांची तोंडे कुणी धरायची, आम्ही तरी ती का बरे धरावीत! पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही ब्रेकींग न्यूज करायला निघालेल्यांचा उदयनराजेंनी नेहमीप्रमाणे ‘गालगुच्चा’ घेतलाच. ‘जो तुम्हारे दिल में है, वो हमारे दिल में नही’ असे लागलीच सांगत उदयनराजेंनी कांगारावळा करुन घेतला. ‘आता बसा, मी भाजपमध्ये गेलोच नाही’ असा ठेंगाच जणू उदयनराजेंनी दाखवला. असे असले तरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी लावलेली हजेरी आणि त्यानंतर राजधानी महोत्सवालाही  मुख्यमंत्र्यांना   दिलेले निमंत्रण याबाबतचे ‘तिखट-मीठ’ थोरल्या साहेबांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याची चढाओढ सुरु झाली आहे. राजेंची ‘कमळा’बाई बरोबर वाढती दिलजमाई पाहून घड्याळ रुसत आहे अन् काटे हसत आहेत.

गांधी मैदानावर हल्लाबोल करताना दाढीला हात लावत शिवेंद्रराजे म्हणाले होते, ‘चूल आम्ही मांडायची, सरपण आम्ही आणायचे, काडीपेटीही आम्हीच आणायची, स्वयंपाक आम्हीच करायचा आणि जेवायच्या पंगतीला दुसराच येवून बसणार, आमच्या आधी ताव मारणार आणि कसे बनवले जेवण हे सांगत सुटणार.’  अबाबा! शिवेंद्रराजे पार जेवणावरच बोलल्यानंतर ‘आम्ही आता तव्यातली भाकरी खाणंच बंद केलं आहे’, असे उदयनराजे म्हणाले होते. शिवेंद्रराजे व उदयनराजे ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या संस्थापकांच्या टोपलीतलीच भाषा दोन्हीही राजांनी करावी यात नवल ते काय! पवारांनीच नव्हे का ते सुप्रसिद्ध ऐतिहासिक विधान केले होते, ‘भाकरी करपायला लागली तर ती फिरवावी लागते’. सातार्‍यात येवून कॉलर उडवलेल्या पवारांच्या भन्नाट डोक्यात नेमके काय ‘फिटींग’ आहे हे अजितदादांच्या शेजारी बसून घड्याळाचे ‘सेटींग’ करणार्‍या शिवेंद्रबाबांना अथवा फडणवीसांशी मुंबईत जावून ‘डेटींग’ करणार्‍या छत्रपती उदयनराजेंना सुद्धा समजणार नाही. पवारांच्या उक्ती व कृती मागचे ‘गेटींग’ समजायला सातारकरांनो, जरा ‘वेटींग’ करा की राव!