Thu, Sep 24, 2020 15:53होमपेज › Satara › इथे कोयत्यांवरही होतात समस्यांचे वार...

इथे कोयत्यांवरही होतात समस्यांचे वार...

Published On: Dec 18 2017 4:13PM | Last Updated: Dec 18 2017 4:12PM

बुकमार्क करा

सातारा : सुनील क्षीरसागर

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता गतीमान झाली आहे. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर भागातून हजारो ऊस तोड कामगार आपला संसार पाठीवर टाकून उसाच्या फडात दाखल झाले आहेत. घर, गाव सोडून आलेल्या ऊस तोड कामगारांना ऊस तोडीचे काम प्रचंड कष्टाने करावे लागते. यामुळे या कामगारांच्या मुलांचे सर्वच प्रकारे हाल होतात. या कामात कसलीही सुरक्षा नाही की, भविष्याची खात्री नाही अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेले ऊस तोडणी कामगार अद्याप त्यातून बाहेर पडले नाहीत.  उसावर सपासप चालणार्‍या या कोयत्यांवरच समस्यांचे वार होत असल्याने या मजुरांचे रोजचे जगणे आजही हलाखीचेच राहिले आहे. 

साखर कारखान्यांची चिमणी पेटली की, ऊस तोडणी कामगार आपला सर्व संसार सोबत घेऊन कारखान्यांवर दाखल होतात. विंचवाच्या बिराडासारखा संसार पाठीवरच असतो. कुटुंबातील प्रत्‍येकाच्या वाट्याचा ऊस तोडीचा कोयता कुणाला चुकत नाही.  कारखाना परिसरात पाचटापासून  तयार केलेल्या झोपड्यांत राहून हंगाम संपेपर्यंत या कामगारांचे वास्तव्याचे ठिकाणही हेच. पहाटे चार वाजताच यांच्या दिवसाची सुरूवात होते. भल्या थंडीत बायका पोरांसह ऊस तोडणीला निघायचं. तोडलेला ऊस बांधण्याचे काम महिला कामगार करतात. कामातील चोखपणा त्यांच्या कामातूनच दिसून येतो.

सकाळ ऊस तोडणी तर दुपारी उसाने भरलेली बैलगाडी कारखान्याकडे घेऊन निघायचं. यानंतर महिला संसाराकडे वळतात, पुरूष मंडळी बैलगाडी घेऊन रांगेत थांबतात. एवढी कष्टाची कामे करूनही कामाचा योग्य मोबदला मिळतो असं नाही, मात्र रात्रंदिवस कामाचा फेरा या कामगारांना कुणालाच चुकला नाही. या काबाडकष्टात योग्य मोबदल्याची, सुरक्षेची आणि भविष्याच्या तरतुदीची जबाबदारी थेटपणे कारखान्‍यांवर येत नाही. 

उन्‍हातान्‍हातून १२ ते १४ तास काबाडकष्ट करणार्‍या या ऊस तोड कामगारांच्या प्रगतीसाठी ज्या गतीने योजना राबविणे गरजेचे होते, तसे कधीच झाले नाही. काही वर्षापूर्वी ऊस तोडणी कामगारांसाठी मेळावे घेण्यात आले, अश्वासनांचा पाऊसही पाडण्यात आला, पण प्रत्यक्षात ऊस तोडणी कामगारांच्या आयुष्यातील ऊस तोडीचा कोयता काही सुटला नाही. पदरी कायमस्‍वरूपी निराशाच निराशा. 

ज्याप्रमाणे ऊस तोडणी कामगारांच्या समस्या आहेत, त्‍याप्रमाणेच त्यांच्या मुलांच्याही गंभीर समस्या आहेत. मुलांचे शिक्षणाचा प्रश्न, गरोदर माता, नवजात बालकांच्या समस्या अशा एक ना अनेक समस्यांनी ऊस तोडणी कामगारांचे जीवन ग्रासले आहे. यासाठीच या कामगारांच्या मुलांसाठी पुन्‍हा साखर शाळा सुरू करण्याची मागणी आणि विमा संरक्षण कवच देण्याची मागणी होत आहे.