होमपेज › Satara › कराडः उसाची पहिली उचल ३५०० द्या अन्यथा दिवाळी सुखाने खाऊ देणार नाही

कराडः उसाची पहिली उचल ३५०० द्या अन्यथा दिवाळी सुखाने खाऊ देणार नाही

Published On: Oct 24 2018 6:31PM | Last Updated: Oct 24 2018 6:31PMमारूल हवेली : वार्ताहर 
चालू वर्षी ऊसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या अन्यथा कारखानदारांना दिवाळी सुखाने खाऊ दिली जाणार नाही. यामध्ये पहिला नंबर देसाई कारखान्याचा असेल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी दिला.

मल्हारपेठ ( ता. पाटण ) येथे शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजीत केलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी कोळेकर, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर हेबांडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपाली कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोडसे म्हणाले, गुजरातमध्ये ऊसासाठी प्रति टनास 4200 ते 4600 रूपये दर दिला जातो. मात्र आपल्याकडे हा दर दिला जात नाही. कारखानदारांच्या हातात प्रचंड पैसा असतानाही शेतक-यांसाठी त्यांची दानत होत नाही. तसेच यावेळी ऊस बीलाचे तुकडे होऊ देणार नाही. शेतक-यांची सर्व बाजूने पिळवणूक सुरू आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर कोणी ब्र शब्द काढत नाही. मात्र कांद्याचे दर वाढले की सातवा वेतन आयोग घेणारे ओरड सुरू करतात. सध्याचे सरकार हे खोटे बोला पण रेटून बोला अशा धोरणाचे आहे. या पट्यात कमळ फुलले नसल्याने येथील जनतेशी त्यांना काही देणं घेणे नाही. शेतकरी, अंगणवाडी सेविका, एस.टी. कर्मचारी, व्यापारी, उद्योजक असा कुठलाही वर्ग समाधानी नाही. नोटाबंदीचा भार जनतेच्या माथी बसला आहे.  राज्यात प्रंचड दुष्काळ आहे.

कराड - पाटण मार्गावरील सुरू असलेल्या कामात शेतक-यांचे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई शासनाने दिली पाहिजे. याची दखल घेतली गेली नाहीतर काम बंद पाडू. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. कोयनेची वीज पुणे, मुंबईला जाते. मात्र लोडशेडींग पाटण तालुक्यातील जनतेला सोसावे लागते. वीजेबाबत शेतक-यांना त्रास दिल्यास शेतात उभे असलेले टॉवर हटवले जातील. या परिषदेस तालुक्यातून आलेल्या शेतक-यांची व पदाधिका-यांची उपस्थिती होती. आभार शिवाजी कोळेकर यांनी मानले.

पाटण मधील धुराडं पेटवून देणार नाही : गोडसे
शेतक-यांनी संघर्ष केल्याशिवाय ऊसाच्या बाबतीतील पाटण मधील अंदाधुंद कारभार संपणार नाही. पाटण तालुक्यात शेतकरी संघटनेची आंदोलने होत नाहीत असा काहींचा गैरसमज आहे. मात्र यावेळी शेतक-यांची ताकद त्यांना दाखवून देवू असा टोला आ. शंभूराज देसाई यांना लगावला. मागणीप्रमाणे पहिली उचल जाहिर न केल्यास आंदोलनाची सुरूवात पाटण तालुक्यातून करत एकाही कारखान्याचे धुराडे पेटवून देणार नाही असा इशारा शंकरराव गोडसे यांनी यावेळी दिला.