Wed, Jul 08, 2020 09:15होमपेज › Satara › परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 8:42PMसातारा : मीना शिंदे

दहावी व बारावीच्या परीक्षेत पेपरफुटी व कॉपी सारखे प्रकार रोखण्यासाठी यंदा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. प्रश्‍नपत्रिकांच्या वितरणात बदल करण्याचा महत्वूपर्ण निर्णय घेतल्यानंतर शिक्षण मंडळाने आता परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना मोबाईलबंदी केली आहे. दरम्यान, परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 

गेल्या 5 ते 6 वर्षापासून परीक्षा सुरू होण्यापूर्वी व्हॉटसअ‍ॅपवर प्रश्‍नपत्रिका अथवा त्यातील काही प्रश्‍न येण्याचे प्रमाण वाढले होते.या प्रकारांना आळा बसावा यासाठी यावर्षी परीक्षांच्या नियमात काही महत्वपूर्ण बदल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहेत. बोर्ड परीक्षेवेळी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष पेपर सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही.तसेच प्रश्‍नपत्रिकांचे वितरण करताना 25 प्रश्‍नपत्रिकांचे एक पाकीट तयार केले जाणार आहे. हे मोहोरबंद पाकिट पर्यवेक्षक वर्गात विद्यार्थ्यांच्या समक्ष उघडणार आहेत. त्यावर दोन विद्यार्थ्यांच्या सह्याही घेण्यात येणार आहेत. यामुळे वर्गनिहाय वितरण करण्याचा वेळ वाचणार आहे. 

परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक मोबाईल घेऊन  जाऊ शकत होते. खबरदारीचा उपाय म्हणून पर्यवेक्षक तसेच इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मोबाईल केंद्रप्रमुखांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रप्रमुखांना ऐनवेळी येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी मंडळाशी  संपर्क साधावा लागतो. यामुळे केंद्रात केवळ त्यांनाच मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये  होणार्‍या गैरप्रकरांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.  यामध्ये 7 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.  तसेच सर्व केंद्रावर पूर्णवेळ बैठी पथके कार्यरत रहाणार असून त्यामध्ये महसूल, शिक्षण, गटविकास अधिकारी, पोलिस दलातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. तालुका स्तरावर, केंद्र स्तरावर व शाळास्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचा अवलंब रोखण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

सर्व परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम जाहीर करण्यात आले असून चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. या सर्व व्यवस्थेमुळे बोर्ड परीक्षा कॉपीच्या अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे.