Sat, Dec 14, 2019 08:51



होमपेज › Satara › शिवप्रतापदिनी प्रतापगडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शिवप्रतापदिनी प्रतापगडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Last Updated: Dec 04 2019 1:09AM




प्रतापगड : वार्ताहर
छ. शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन मर्दानी खेळ, अशा उत्साही वातावरणात किल्‍ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 

हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्‍तांनी मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होत असताना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणांनी किल्ले प्रतापगड परिसर दुमदुमून गेला.

सुर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्याला प्रारंभ झाला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या हस्ते भवानी मातेस महाअभिषेक झाल्यानंतर  भवानी मातेची मनोभावे महाआरती करण्यात आली. भवानी मातेचे पुजारी नरहरी हडप आणि किल्‍लेदार विजय हवालदार यांनी कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.                      

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवतांडव ढोल पथक जावली व स्वराज्य ढोल पथक, तुता-या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. 

मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर छ. शिवरायांची मूर्ती असलेल्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, तुता-या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व छ. शिवरायांचा जयजयकार करणार्‍या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. 

अश्‍वारूढ पुतळ्याजवळ छत्रपती शिवरायांच्या पालखीचे आगमन झाल्यावर अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  ‘क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज......’ या ललकारीने अन् छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने प्रतापगडावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण केल्यानंतर तोफेची सलामी देण्यात आली. सातारा पोलिस दलाच्या बँण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर गायकवाड, आसनगाव  आणि सहकारी व पारसोंड येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम पोवाडा सादर केला.

यावेळी उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, वाई उपविभागीय दंडाधिकारी संगीता राजापुरकर (चौगुले), पोलिस उपअधीक्षक अजित टिके, तहसीलदार सुषमा पाटील, महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, पंचायत समिती महाबळेश्‍वरचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे -पाटील,  नायब तहसीलदार सोनावणे,  मिलिंद एकबोटे तसेच हजारो शिवभक्‍त उपस्थित होते.

दरम्यान, प्रतापगड ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण किल्ल्यावर रांगोळी काढण्यात आली होती त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर विविध प्रकारच्या फुलांची  सजावट केली होती. नगरपालिका महाबळेश्‍वर यांच्यावतीने सर्व शिवभक्‍तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आ. अजय चौधरी यांच्या वतिने लाडू, सरबताचे वाटप करण्यात आले.

छ. शिवरायांच्या पुतळा परिसरात  विविध प्रकारच्या फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण प्रतापगड परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाबळेश्‍वर आगाराने शिवभक्‍तांसाठी कुंभरोशी ते प्रतापगड अशा बसफेर्‍या ठेवण्यात आलेल्या होत्या. 

प्रतापगड ग्रामस्थ व संयुक्‍त वनव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्‍त विद्यमाने सर्व शिवभक्‍तांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मर्दानी खेळाने इतिहासाला उजाळा
छावा प्रतिष्ठान, अतित यांनी लाठी चालवणे, तलवार बाजी, दांडपट्टा, कुर्‍हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची थरारक प्रात्यक्षिके करून उपस्थितांची मने जिंकली. या मर्दानी खेळामुळे शिवकालिन इतिहासाला उजाळा मिळाला.