होमपेज › Satara › अजित पवारांकडून फोन : भेट टाळली; भाजप प्रवेशाची शक्यता बळावली

आ.शिवेंद्रराजेंची दांडी; राष्ट्रवादीची घाबरगुंडी 

Published On: Jul 26 2019 1:50AM | Last Updated: Jul 25 2019 11:13PM
सातारा : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी गुरुवारी सातार्‍यात घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींना सातारा-जावलीचे आमदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले यांनी दांडी मारल्याने जिल्ह्याच्या राजकीय गोटात तर खळबळ उडालीच; पण राष्ट्रवादीमध्येही घाबरगुंडी झाली. आ. अजित पवार यांनी शिवेंद्रराजेंना फोनही लावला. मात्र ते एक्सरसाईज करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. शिवेंद्रराजेंनी अजितदादांची भेट टाळल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चांना आणखी बळकटी मिळाली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार व पक्षनिरीक्षक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी भवनात गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीच्या मुलाखतीला प्रारंभ झाला. परंतु या मुलाखतींसाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्जही केला नव्हता आणि सातार्‍यात असूनही ते मुलाखतीलासुद्धा हजर राहिले नाहीत.एवढेच काय, शिवेंद्रराजेंचे जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, सोसायट्यांचे पदाधिकारी यापैकी कुणीही राष्ट्रवादी भवनाकडे फिरकला नाही. दिवसभरात शिवेंद्रराजेंना संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, ते अजितदादांना भेटायला शेवटपर्यंत आले नाहीत. 

शिवेंद्रराजेंच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीने जिल्ह्यातील इतर मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पत्रकार परिषदेवेळी आ. शिवेंद्रराजेंच्या अनुपस्थितीबद्दल आ. अजितदादांना छेडले असता ते म्हणाले,  माझ्या बारामतीमध्येही मी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. याचा अर्थ अजित पवार राष्ट्रवादीचा नाही का? राजेश टोपे, राणा पाटील यांनीही अर्ज भरला नव्हता. साधारण ज्या भागांमध्ये एकच नाव असतं, त्याठिकाणी सगळीकडून अर्ज येतातच असं नाही. खासदारकीच्या निवडणुकीला अर्ज न मागवताही चर्चा करून उमेदवारी दिली, असं शिवेंद्रराजेंच्या बोलण्यात आलं. त्यांनी त्याचा काही विचार करून अर्ज दिला नसेल. शिवेंद्रराजेंनी पक्षाकडे अर्ज केलेला नसला तरीही शिवेंद्रराजे यांनी चार दिवसांपूर्वी पवारसाहेबांची भेट घेतली त्या बैठकीला मी नव्हतो. मात्र, त्यावेळी रामराजे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण हे होते. त्यांची पवारसाहेबांबरोबर  मीटिंग झाली असून वेगळा अर्थ लावू नका. कामाच्या व्यापातून माझाही बारामतीतून उमेदवारी अर्ज भरायचं राहून गेलं. 

उदयनराजेंनी पक्षाचा जसा अर्ज भरला नाही तसंच शिवेंद्रराजेंकडूनही अर्ज आला नाही. पण शिवेंद्रराजे आमच्याबरोबर राहतील, असेही आ. अजित पवार म्हणाले. आ. शिवेंद्रराजेंनी पक्षाकडं  अर्ज सादर केला नसला तरी सातार्‍यात असूनही ते राष्ट्रवादी भवनात आले नाहीत. आपल्या भेटीला आले नाहीत असं पूर्वी कधी घडलं नाही, याकडे लक्ष वेधले असता आ. अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना बर्‍याचदा असे घडले आहे. शिवेंद्रराजेंना सकाळीच मी फोन केला होता. त्यावेळी ते एक्झरसाईजला गेले होते. कॉन्टॅक्ट करतो म्हणून त्यांनी त्यावेळी 
सांगितलं, ते आमच्याबरोबरच राहतील, असा खुलासाही आ. अजितदादांनी केला.   

अजितदादा निघून गेल्यानंतर शिवेंद्रराजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेले. कुडाळ येथे  दि. 30 रोजी आ. शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला असून या मेळाव्यात शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांकडून आगामी राजकीय वाटचालीचा निकाल घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात शिवेंद्रराजेंवर कार्यकर्त्यांचा दबाव असून शिवेंद्रराजेेही वन टू वन कार्यकर्त्यांशी बोलत असल्याचे दिसत आहेत. 

लगतच्या चार मतदारसंघांत इफेक्ट 

जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्याशीही मनमोकळी चर्चा केली. त्यामुळे शिवेंद्रराजे धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला सातार्‍यात मोठे भगदाड पडणार असून त्याचा फटका लगतच्या चार विधानसभा मतदारसंघांवर होणार आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंना थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.