Tue, May 26, 2020 14:18होमपेज › Satara › शिवेंद्रराजे अ‍ॅडमिट झाले अन् सातारा थबकला

शिवेंद्रराजे अ‍ॅडमिट झाले अन् सातारा थबकला

Last Updated: Feb 20 2020 10:49AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

मंगळवारची रात्र सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीचा धोका टळला. संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी ते स्वत: बुधवारी सकाळी मुंबईला गेले. सातारकरांनी ‘गेट वेल सून’च्या प्रार्थना सुरू केल्या आहेत. 

वाचा : बड्या पोलीस अधिकार्‍याचे अंडरवर्ल्डशी घनिष्ठ संबंध?

आ. शिवेंद्रराजे भोसले दररोज सायंकाळी वॉकिंगला जातात. मंगळवारीही ते वॉकिंगला जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत दुखू लागले. जवळच्या मित्रांना त्यांनी तातडीने बोलावले. अ‍ॅसिडीटीपेक्षा वेगळा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटल येथे नेले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी तातडीने यंत्रणा हलवली. प्रतिभा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांनी कमी वेळेत अत्याधुनिक उपचार प्रणाली राबवित शिवेंद्रराजेंचा पल्सरेट नॉर्मलवर आणला. 

शिवेंद्रराजेंची प्रकृती स्थिर करण्यासाठी डॉ. साबळे व टीमने प्रयत्नांची शिकस्ती केली. योग्यवेळेत त्वरित उपचार झाल्याने शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीने उपचारांना प्रतिसाद दिला. मात्र, दरम्यानच्या काळात शिवेंद्रराजे अ‍ॅडमिट झाल्याच्या वार्तेने आख्खा सातारा रात्रीच्यावेळेस जागच्या जागीच थबकला. कार्यकर्त्यांसह शिवेंद्रराजेंंच्या चाहत्यांनी प्रतिभा हॉस्पिटलकडे धाव घेतली. आत शिवेंद्रराजेंवर उपचार सुरु होते तेव्हा प्रतिभा हॉस्पिटलबाहेर  तोबा गर्दी ‘आपला राजा या संकटातून बाहेर पडू दे’, अशी प्रार्थना करीत होती. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवघराण्यातील राजावर आलेले हे संकट टळू दे, अशी आर्जव करताना कार्यकर्ते दिसत होते. हजारो कार्यकर्त्यांच्या करुणेने शिवेंद्रराजे संकटातून बाहेर आले. रात्री उशिरापर्यंत डॉ. सोमनाथ साबळे व त्यांची टीम शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीची काळजी घेताना दिसत होती. तर शिवेंद्रराजेंचा मोठा मित्र परिवार जागल्याच्या भूमिकेत होता. 

वाचा : नातवाला भेटण्यापासून आजोबा, आजीला रोखता येणार नाही : हायकोर्ट

बुधवारी सकाळी संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या कराव्यात यासाठी शिवेंद्रराजे स्वत:च्या वाहनातून मुंबईला रवाना झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने सातारकरांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. 

उदयनराजे आले अन् वातावरण गलबलले...
रात्री उशिरा शिवेंद्रराजेंची प्रकृती स्थिर झाली. मात्र, तिकडे पुण्यात असलेल्या छत्रपती उदयनराजेंना शिवेंद्रराजेंच्या अ‍ॅडमिट  केल्याची वार्ता समजली. ते तातडीने सातार्‍याला आले. उदयनराजे प्रतिभा हॉस्पिटलमध्ये येताच वातावरण गलबलून गेले. अश्रू भरल्या नजरेने उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना मिठी मारली. त्यांच्या गालाचा पापा घेतला. ‘मी असताना तुम्हाला काही होऊ देणार नाही,’ असे म्हणत उदयनराजेंना गहिवरून आले. ‘उपचार घेत असलेल्या शिवेंद्रराजेंनीच उदयनराजेंची समजूत काढली. मी ठीक आहे, काळजी करू नका,’ असे शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना सांगितले. उदयनराजेंनी डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. उदय फडतरे, डॉ. साठे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही शिवेंद्रराजेंची प्रकृती स्थिर असल्याचे उदयनराजेंना सांगितले. त्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनाही दिलासा दिला. दोन भावांच्या अंतरिक प्रेमाची प्रचिती यावेळी सातारकरांना आली.

अजित पवार, फडणवीस यांनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट 

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने मंगळवारी रात्री सातार्‍यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पहाटे मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शिवेंद्रराजेंना मुंबईत उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. 

आ. शिवेंद्रराजे भोसले मंगळवारी वॉकिंगला जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तातडीने प्रतिभा हॉस्पिटल येथे नेले. तेथे रात्री त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बुधवारी त्यांची प्रकृती स्थीर झाल्यानंतर  पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व माजी मुख्यमंत्री आ. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेवून विचारपूस केली. त्यांच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.