Sat, Jul 11, 2020 21:01होमपेज › Satara › माझा कुणा म्हणू मी...?

माझा कुणा म्हणू मी...?

Published On: Oct 05 2018 1:09AM | Last Updated: Oct 05 2018 1:09AMसातारा : हरीष पाटणे 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार सातार्‍यात येणार म्हटले की ते निघण्यापासून परत जाईपर्यंत बर्‍याच राजकीय घटना, घडामोडी व उलथापालथी घडत असतात. गुरुवारी सातारा दौर्‍यावर आलेल्या पवारांना भेटण्यासाठी उडालेली लगबग सातारा लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य रणनीतीचे संकेत देणारी ठरली. पुण्यातून पवारांच्या गाडीत आलेले श्रीनिवास पाटील व सातार्‍यात आल्यानंतर पैलवानांसह पवारांना भेटलेले खा. उदयनराजे या दोघांच्याही देहबोलीनंतर ‘माझा कुणा म्हणू मी’ अशी राजकीय मनोवस्था  शरद पवार यांची झाली आहे.

मुळातच लोकसभेची ही निवडणूक आत्ताच गाजू लागली आहे. उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. शरद पवार यांचा कल खा. उदयनराजे यांच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच पक्षात सुरु झालेला बेबनाव पॅचअप करण्याच्या दिशेने पवार सूत्रे हलवताना दिसत आहेत. समजुतीच्या बैठका त्यासाठीच त्यांनी सुरु केल्या आहेत. बारामतीत दोन्ही गटांना पवारांनी चुचकारल्यानंतर सातार्‍यातही त्यांची ‘मन की बात’ सुरु झाली आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे शाळकरी मित्र. दोनवेळा कराड लोकसभा मतदार संघाचे ते खासदार राहिले आहेत. प्रशासकीय सेवेचा जबरदस्त अनुभव त्यांना आहे. शालेय जीवनापासून आजपर्यंत पवारांना त्यांनी केलेली सोबत विचारात घेवूनच पवारांनी त्यांना सिक्कीमचे राज्यपाल केले. राज्यपाल पदाची सूत्रे खाली ठेवताच श्रीनिवास पाटील पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात कमालीचे सक्रीय झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादीतले आमदारही त्यांची बाजू घेताना दिसत आहेत.  

►शरद पवारांनी आणले पुण्यातून श्रीनिवास पाटील यांना सोबत(व्हिडिओ)

सातारा जिल्ह्यातल्या अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी दिसत आहे. शरद पवारांच्या गेल्या खेपेच्या दौर्‍यातच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका बाजूला श्रीनिवास पाटील यांची बाजू अशी भक्कम असताना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज  व विद्यमान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले हा हुकुमाचा एक्का शरद पवार यांच्याकडे आहे. खा. शरद पवार यांना कोणत्याही परिस्थितीत  उदयनराजे यांना दुखवायचे नाही. उदयनराजे हे मास लिडर आहेत, तरूणांची मोठी फौज उदयनराजेंभोवती आहे,  राज्यभर त्यांचा करिश्मा आहे. केवळ पक्षातले सहकारी म्हणतात म्हणून उदयनराजेंना डावलायचे पवारांच्या पचनी पडत नाही. उदयनराजे भाजपच्या गोटात गेले तर मराठा समाजाचे लिडर म्हणून भाजप त्यांना राज्यभर प्रचार सभांमध्ये फिरवू शकतो, हे पवारांना पक्के ठाऊक आहे. म्हणून पक्षातल्या आमदारांचा व ज्येष्ठ सहकार्‍यांचा विरोध असला तरी शरद पवार त्यांची समजूत काढू लागले आहेत. मात्र, त्याचवेळी ते उदयनराजेंनाही इशारे देताना दिसत आहेत. 

एका मुलाखतीत त्यांनी ‘राजे पदाचे भान राहिले नाही तर सामान्यांना यातना सहन कराव्या लागतात’, असा  टोला लगावला होता. त्याच पवारांनी सातार्‍यात येताना श्रीनिवास पाटील यांना सोबत घेतले. उदयनराजे समोर आल्यानंतर ‘इथं एकच पैलवान दिसतो  आहे’, असे म्हणत उदयनराजेंना पुन्हा एकदा चुचकारले. पवारांची ही खेळी ‘समझने वाले को इशारा काफी है’. एकाच वेळी पवारांनी पक्षातील आमदारांवरही कमांड ठेवली आहे तर दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांना सोबत ठेवत ‘माझ्याकडे पर्याय तयार आहे’, असा सूचक इशारा उदयनराजेंच्या दिशेनेही ठेवला आहे. 

►उदयनराजेंकडे पहात पवार म्हणाले, 'मला तर इथे एकच पैलवान दिसतोय'

गुरूवारी विश्रामगृहावर पवारांनी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे यांच्याशीही चर्चा केली. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर व आ. शिवेंद्रराजे भोसले पवारांच्या या दौर्‍यात दिसले नाहीत. पवारांनी मात्र गुरूवारच्या दौर्‍यातही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. निवडणुकांच्या बाबतीत शरद पवार गंभीर असल्याचे चित्र दिसले. जसजशी लोकसभेची लगीन घटिका जवळ येईल व टोकाचे इच्छुक वाढतील तेव्हा ‘माझा कुणा म्हणू मी’ अशी मनोवस्था पवारांची होणार आहे. त्यामुळेच सातार्‍यात वाढत चाललेला हा गुंता पवारांना वेळीच सोडवायचा आहे. त्यासाठी त्यांनी काही मोहरेही कामाला लावले आहेत.