Sat, Jul 11, 2020 14:08होमपेज › Satara › राष्ट्रवादीकडून सातार्‍यात जोरदार शक्‍तिप्रदर्शन

राष्ट्रवादीकडून सातार्‍यात जोरदार शक्‍तिप्रदर्शन

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 11:37PM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीतर्फे सातारा लोकसभा पोट-निवडणुकीसाठी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी तर सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून दीपक पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्‍तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांनी एकत्रितपणे गांधी मैदान येथून विराट रॅली काढली. त्यामध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्ष महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते   सहभागी झाले होते. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना गुरुवारी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील व दीपक पवार यांनी गांधी मैदान ते पोवई नाका अशी विराट रॅली काढली. राजवाडा येथील श्री अजिंक्य गणेशाचे दर्शन घेवून गांधी मैदान येथून ढोल-ताशा, तुतारी, सनई-चौघडे, फटाक्याची आतषबाजीत रॅलीला सुरुवात झाली. 

या रॅलीत आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, देवराज पाटील, रजनी पवार, समिन्द्रा जाधव, जयश्री पाटील, पार्थ पोळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ही रॅली गांधी मैदान, राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, पोलिस मुख्यालयमार्गे पोवईनाका अशी काढण्यात आली. पोवई नाका येथे पोहचल्यावर दोन्ही उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

श्रीनिवास पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे तर सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दीपक पवार यांनी प्रातांधिकारी  मिनाज मुल्‍ला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, राजकुमार पाटील उपस्थित होते.  

भक्‍ती प्रदर्शन पवारांकरता : श्रीनिवास पाटील

आजची ही गर्दी पाहता हे भक्‍ती प्रदर्शन शरद पवारांकरता आणि शक्‍ती प्रदर्शन उमेदवाराकरता आहे. सातारासारख्या ऐतिहासिक शहरातून निघालेल्या रॅलीकरता  खेडेगावातून न आणता ही माणसं आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन वेळा निवडून दिलेले खासदार काही कारण नसतानासुध्दा पक्ष सोडून  गेले. याचा राग लोकांच्या मनामध्ये असल्याचे श्रीनिवास पाटील म्हणाले.

बदल होणार हे निश्‍चित : दीपक पवार

राजेंच्या विरोधात अनेक लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असल्याचे  झालेल्या गर्दीवरून दिसून आले आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा असल्यामुळे मतदारराजा राष्ट्रवादीला बांधील आहे. आजची गर्दी पाहिली तर बदल हा होणारच  हे निश्चित असल्याचा विश्‍वास दीपक पवार यांनी व्यक्‍त केला.