Tue, Aug 11, 2020 21:55होमपेज › Satara › जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सोळा महिलांनीच लढवली ‘विधानसभा’

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सोळा महिलांनीच लढवली ‘विधानसभा’

Published On: Oct 03 2019 2:16AM | Last Updated: Oct 02 2019 11:50PM
खेड : अजय कदम 

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत विधानसभेच्या सर्व मतदार संघातील मिळून एकूण 123 निवडणुका झाल्या. दोन पोटनिवडणुकांसह झालेल्या या निवडणुकांमध्ये एकूण 718 जणांनी लढत दिली. त्यामध्ये पुरोगामी समजल्या जाणार्‍या या जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सोळाच महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी फक्त दोनच महिला आमदार होऊ शकल्या.

महिलांना आरक्षण देण्याबाबत अनेकदा राष्ट्रीय, राज्य पातळीवर खलबते होतात. पण प्रत्यक्षात महिलांना या सर्व प्रक्रियेत किती स्थान मिळते ही गोष्ट वेगळीच असून त्यांच्या सबलीकरणासह स्वायत्तेबाबत होत असलेले निर्णय प्रत्यक्षात राबविले जात नाहीत. राजकीयद़ृष्ट्या जागरूक समजल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या इतिहासाच्या पानात डोकावून पाहिले तर येथेही निवडणुकीच्या राजकारणात महिलांची संख्या नगन्यच आढळते.

स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून सातारा जिल्ह्यात सातारा व पाटण विधानसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकांसह 2014 अखेर एकूण 124 निवडणुका झाल्या. एकूण 750 उमेदवारांनी या निवडणुकांमध्ये लढत दिली. त्यामध्ये आतापर्यंत फक्त 16 महिला निवडणूक रिंगणात होत्या. हा आकडा खूप काही सांगून जातो. त्यापैकी प्रभावती सोनवणे शिंदे या माण मतदार संघातून 1967 व 1972 अशा दोन निवडणुकांत विजयी झाल्या तर कोरेगाव विधानसभा मतदार संघातून डॉ. शालिनीताई पाटील यांनी 1990, 1995, 1999, 2004  या वर्षातील निवडणुका लढवल्या. त्यापैकी 1990 व 1995 च्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1999 व 2004 मध्ये त्या उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांना विजय नोंदवता आला.  प्रभावती सोनवणे व डॉ. शालिनीताई पाटील या दोन आमदार वगळता विधानसभा निवडणुकीत गेल्या 63 वर्षात इतर महिलांना आमदार होण्याची संधी मतदारांनी दिली नाही.

सातारा विधानसभा मतदार संघात 1990 मधील निवडणुकीत राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले शिवसेनेच्या उमेदवार होत्या. काँग्रेसचे श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या विरोधात त्यांनी लढत दिली होती. बाळासाहेब देसाई यांच्या स्नुषा विजयादेवी देसाई यांनी 1990 मध्ये पाटणमधून काँग्रेसच्या विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी लढत दिली होती. वडूजला 1942 मध्ये इंग्रजांविरूद्ध काढलेल्या मोर्चाच्यावेळी 9 जण हुतात्मा झाले. त्यापैकी परशुराम घार्गे यांच्या पत्नी हिराबाई घार्गे यांनी 1957 मध्ये खटावमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रजासमाजवादी पक्षाचे अ‍ॅड. केशवराव पाटील विजयी झाले होते.

त्याशिवाय 1995 मध्ये जावली मतदार संघातून अपक्ष म्हणून वनिता रामचंद्र बगाडे, 1995 मध्ये कराड उत्तर मतदार संघातून अपक्ष म्हणून इंदूबाई काकासाहेब पाटील, 2004 मध्ये कराड दक्षिणमधून अपक्ष बनूबाई दगडू येवले, खटाव मतदार संघातून बहुजन समाज पक्षातर्फे कांताबाई अशोक बैले, 1962 मध्ये माण विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून कोयना कृष्णा खाडे, 2004च्या निवडणुकीत वाई विधानसभा मतदार संघातून स्वतंत्र भारत पक्षातर्फे कुमुदिनी कोंढाळकर तर 2009च्या विधानसभा निवडणुकीत सातारा मतदार संघातून अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अलंकृता बिचुकले, कोरेगाव मतदार संघातूनही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. तसेच वाई विधानसभा मतदार संघातून सुधा साबळे आणि माण विधानसभा मतदार संघातून संगीता शेलार, कौसल्या साबळे या महिला उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात होत्या. 2014 मध्येही उमेदवारी दाखल केलेल्या महिलांची  संख्या ही कमीच होती.