होमपेज › Satara › सेनेत गेलेल्या महेश शिंदेंची कसोटी लागणार

सेनेत गेलेल्या महेश शिंदेंची कसोटी लागणार

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 8:09PM
कोरेगाव : प्रतिनिधी

कोरेगाव विधानसभा मतदार संघातील लढतीचे चित्र यापूर्वी स्पष्ट झाले असले, तरी पक्ष बदलामुळे नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या मूळच्या भाजपवासीय महेश शिंदेंपुढे आव्हाने उभी राहिली आहेत. महायुतीच्या जागा वाटपानंतर येथील भाजपमध्ये गलबला निर्माण झाला असून, बदलत्या घडामोडीतून सावरून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्यासाठी महेश शिंदेंना कसरत करावी लागणार आहे, तर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना पडझड झालेले राष्ट्रवादीचे जहाज किनार्‍याला नेण्यासाठी अनेक अडचणींचे दिव्य पार करावे लागणार आहे. 

कोरेगाव मतदार संघात शशिकांत शिंदेंविरुद्ध महेश शिंदे यांच्यात घमासान  होणार, हे निश्चितच होते. मात्र, महायुतीच्या जागा वाटपाकडे लक्ष लागून राहिले होते. कोरेगावची जागा युतीअंतर्गत शिवसेनेकडे असल्यामुळे हा मतदार संघ नक्की कोणाकडे जाणार, याची उत्कंठा लागून राहिली होती. भाजपच्या महेश शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांत या मतदार संघात भाजपला घराघरात पोहोचवले आहे. विविध उपक्रम, विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी भाजपचा झंझावात निर्माण केला आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच भाजपच्या दिग्गज नेतेमंडळींना मतदार संघात आणून टोलेजंग कार्यक्रम पार पाडले आहेत. त्यामुळे हा मतदार संघ युतीच्या जागा वाटपात भाजपकडे जाणार, अशा अटकळी बांधल्या गेल्या होत्या.

मात्र, प्रत्यक्षात हा मतदार संघ आपल्याकडे कायम राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. त्यामुळे महेश शिंदे यांची राजकीय कोंडी झाली. तडजोडीच्या राजकारणात शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवण्याच्या पर्यायापर्यंत त्यांना यावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत, भगवा खांद्यावर घेतलेल्या महेश शिंदेंना आता बंडखोरी टाळून,  भाजप-सेनेची एकत्रित सांगड घालत निवडणुकीचे शिवधनुष्य पेलावे लागत आहे.  ‘भाजप... भाजप..’ असा गजर केल्यानंतर आता शिवसेनेच्या वाघाच्या डरकाळीचा आवाज  मतदार संघातील कानाकोपर्‍यात पोहोचवावा लागणार आहे. शिवसेनेतील इच्छुक किशोर बाचल व रणजितसिंह भोसले यांच्यासह शिवसैनिकांना सोबत घेऊन भाजप-सेनेचा मिलाप घडवून आणण्याचे दिव्य त्यांना पार करावे लागणार  आहे.  

महेश शिंदेंना शिवसेनेत प्रवेश करावा लागला असला, तरी मतदार संघातील त्यांनीच निर्माण केलेली भाजपची ताकद, स्वाभिमानी विचारमंचचे भाजपवासी झालेले सुनील खत्री, युवानेते अ‍ॅड. नितीन भोसले यांची एकत्रित राजकीय शक्ती त्यांच्या पाठीमागे पहाडासारखी उभी आहे. ही त्यांची जमेची बाजू असली, तरी पक्ष बदलामुळे त्यांना आता बदललेले चिन्ह घेऊन मतदारांपुढे जावे लागणार आहे. 
राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी मतदार संघात झपाटा निर्माण करताना कुरघोड्यांच्या राजकारणात अनेक डाव टाकल्याची चर्चा होती.

मात्र, चिन्ह कुठलेही असले तरी महेश शिंदेंशीच निकराची लढाई होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शशिकांत शिंदेंनी नव्या जोमाने मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. राजकीय डावपेचांमध्ये माहीर असलेल्या शशिकांत शिंदे यांनी मतदार संघात आपले मोठे नेटवर्क कार्यरत केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे. या दोन दिवसांत आणखी कोण कोण मैदानात उतरणार? बंडखोरी होणार का? हेही पहावे लागणार आहे. तूर्त तरी दोन शिंदेंमधील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

वाईचा पारंपरिक असलेला शिवसेनेचा मतदार संघ आता भाजपला सोडण्यात आला असून, या ठिकाणी भाजपाच्या वतीने माजी आमदार मदन भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघात आता राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील व भाजपचे मदन भोसले यांच्यातच पारंपरिक लढत रंगणार आहे. दरम्यान, या मतदार संघात मोदी लाट की पवारांचा करिष्मा निर्णायक ठरणार, याविषयी चर्चा रंगू लागली आहे. 

हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी आता राज्यात सत्तेचा सोपान हातात असलेल्या भाजपने पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पाईक असलेले मदन भोसले यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना ताकद दिली आहे. भाजप प्रवेशानंतर मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणून भाजपची वातावरण निर्मिती केली आहे. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनेही या वातावरणात चांगलीच भर टाकली. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात विद्यमान आ. मकरंद पाटील यांना ही लढत एवढी सोपी राहिली नसल्याचे दिसून येते. 

यावेळी मदन भोसले यांच्यासाठी हा मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते काय भूमिका घेणार? याकडे वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभेसाठी टोकाचे इच्छुक असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांना पुन्हा एकदा युतीने डावलल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जाधव यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या उमेदवारीचा फटका युती उमेदवाराला बसेल, अशी चर्चा आहे.

दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर राज्यात विशेषत: सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या करिष्म्याने राष्ट्रवादीला पुन्हा पहिले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याजिल्ह्यातील नेते व पदाधिकार्‍यांना आता चांगलेच बळ आले आहे. तरुण नेतृत्व म्हणून आ. मकरंंद पाटील यांची ओळख असून, आपल्या विकास कामांनी ते भाजपच्या मदन भोसले यांच्यापेक्षा काकणभर सरसच असल्याचे बोलले जात असले तरी उदयनराजे भोसले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या लोकसभा उमेदवारीचा फायदा मदन भोसले यांना होऊ शकतो. 

मागील विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील हे 41 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यावेळी या मतदार संघात त्यांच्याविरोधात असणारे मदन भोसले हे काँग्रेसमधून लढले होते. यावेळी सत्ताधारी भाजपच्या गोटात ते गेल्याने त्यांची ताकद वाढल्याचे दिसून येते. या मतदार संघात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या भूमिकेवरही बरेच काही अवलंबून आहे. त्यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केलेच आहे. असे असले तरी खरी लढत भाजपचे मदन भोसले व राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील यांच्यातच रंगणार, हे निश्चित.