Wed, Jul 08, 2020 16:40होमपेज › Satara › अर्ज भरण्यासाठी आज, उद्या झुंबड

अर्ज भरण्यासाठी आज, उद्या झुंबड

Published On: Oct 03 2019 2:16AM | Last Updated: Oct 03 2019 12:20AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्?याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा शक्तिप्रदर्शनाकडे कल असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. दरम्यान, खंडाळ्यातून शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी बंडाचा झेंडा फडकावला असून ते सातारा लोकसभा व वाई विधानसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय, अखेरच्या दोन दिवसांत कोण कोण मैदानात उतरणार, यावर पुढील रंगत अवलंबून राहणार आहे. 

सातारा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दि. 27 सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र पितृ पंधरवड्यामुळे पहिले चार दिवस कोणत्याही इच्छुकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही; मात्र काहींनी अर्ज नेले. दि. 1 ऑक्टोबरपासून अनेक इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

शिवसेना व भाजपचया जागावाटपावरून बंडखोरी होणार असल्याने अनेकांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस राहिल्याने अपवाद वगळता जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता दि. 3 व 4 रोजी अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडणार असल्याचे चित्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळणार आहे.  गुरुवार, दि. 3 रोजी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, शिवसेनेचे बंडखोर पुरूषोत्तम जाधव, सातारा जावली विधानसभेसाठी दिपक पवार, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे अतुल भोसले, कराड उत्तरमधून शिवसेनेचे धैर्यशील कदम, पाटणमधून राष्ट्रवादीचे सत्यजीत पाटणकर, वाईमधून मकरंद पाटील, कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे, माणमधून भाजपाचे जयकुमार गोरे, ‘आमचं ठरलंय’चे अनिल देसाई हे प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

 शेवटच्या दिवशी दि. 4 रोजी कोरेगावमधून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई, कराड दक्षिणमधून  अ‍ॅड. उदयसिंह पाटील, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर गोरे, वाईतून सेनेचे बंडखोर पुरूषोत्तम जाधव व इतर इच्छूक उमेदवार मैदानात उतरणार आहेत. याशिवाय कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांच्यासह अनेक दिग्गज या दोन दिवसात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.  सर्वच पक्षाचे उमेदवार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावांतून कार्यकर्ते चार्ज करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गावोगावी सध्या अलिशान गाड्या फिरू लागल्या असल्याचे चित्र दिसत आहे.