Wed, Aug 12, 2020 13:15होमपेज › Satara › शिवेंद्रराजेंपुढे दीपक पवारांची कसोटी

शिवेंद्रराजेंपुढे दीपक पवारांची कसोटी

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 8:26PM
सातारा : प्रतिनिधी

पक्ष बदलाच्या घडामोडींमुळे कधी नव्हे एवढे सातारा-जावली मतदार संघातील लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. भाजपवासी झालेले शिवेंद्रराजे भोसले व राष्ट्रवादीत प्रवेश केलेले दीपक पवार यांच्यातील सामना यावेळी रंगणार का? याची उत्कंठा लागून राहिली असून राजेंपुढे पवार कितपत आव्हान उभे करणार? यावरच येथील निकाल अवलंबून राहणार आहे. शिवेंद्रराजेंनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. येथील निकालावरच मतदार संघातील राष्ट्रवादीचे अस्तित्व अवलंबून राहणार आहे. 

सातारा-जावली विधानसभा मतदार संघातील बदलत्या घडामोडींकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, या मतदार संघातील अवघा माहोल बदलून गेला. राष्ट्रवादीपुढे नेतृत्वाचाही प्रश्न उभा राहिला. शिवेंद्रराजे मतदार संघातील राष्ट्रवादी आपल्यासोबत भाजपमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी ठरले. त्यांचे सगळेच राजकीय डावपेच कामी आल्याने येथे भाजपची हवा झाली. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी तेवढा तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे यावेळचीही लढत एकतर्फी होणार, असेच वातावरण होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढलेल्या दीपक पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

पाठोपाठ राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारीही जाहीर केली. दीपक पवार यांनी या मतदार संघात प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या हक्काची व्होट बँक तयार केली आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात 50 हजार 151 मते मिळाली होती. त्यांच्या यशाचे आडाखे बांधले जात असताना ही आकडेवारी सांगितली जाते. मात्र, गत विधानसभा निवडणुकीवरील आकडेवारीवर नजर टाकली असता, दीपक पवारांना बरीच कसरत करावी लागणार आहे. गतवेळी शिवेंद्रराजेंना 97 हजार 964 मते मिळाली होती, तर शिवसेनेच्या दगडूदादा सपकाळ यांना 25 हजार 421 मते मिळाली होती. शिवेंद्रराजे तब्बल 47,813 मतांनी विजयी झाले होते. असे असले तरी यावेळची राजकीय गणिते मात्र पूर्णत: बदललेली आहेत. राष्ट्रवादीतून जिंकलेले शिवेंद्रराजे भाजपमध्ये, तर भाजपमधील दीपक पवार राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे ही लढत लक्ष वेधून घेत आहे. 

शिवेंद्रराजे यांनी मतदार संघावरील पकड कायम ठेवली आहे. भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी कमळ हाती घेतले. सातारा व जावली या दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीची नेतेमंडळी शिवेंद्रराजेंसोबत गेल्यामुळे मतदार संघातील माहोल बदलून टाकण्यात राजे यशस्वी ठरले. राजेंच्या विरोधात ललकारलेल्या भाजपच्या अमित कदम यांनी पुन्हा आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून शिवेंद्रराजेंसाठी काम करू, अशी ग्वाही दिली आहे. विकास कामांचा डोंगर, सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ, मजबूत संघटन या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, तर दुसरीकडे दीपक पवार यांनीही मतदार संघात चमत्कार घडवायचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी मतदार संघात झपाटा वाढवला असून, पक्ष प्रवेशावेळी सातार्‍यात झालेले राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन दीपक पवारांना ऊर्जा देणारे आहे. 

शिवेंद्रराजे यांचे मतदार संघावर वर्चस्व कायम असल्यामुळे दीपक पवारांना वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही. राजेंच्या विरोधात लढताना त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यांच्या यशापयशावरच येथील राष्ट्रवादीचेही अस्तित्व अवलंबून राहणार आहे. 

    शिवेंद्रराजेंच्या प्रवेशामुळे मतदारसंघात भाजपला बळकटी 

    राष्ट्रवादीची ताकद दीपक पवारांना फलदायी ठरणार

    पक्ष अदला-बदलीनंतर सातारा - जावलीतील जनता कुणाकडे?