Sun, Aug 09, 2020 11:18



होमपेज › Satara › अभयसिंहराजेंच्या राजकीय कारकिर्दीचा उदय

अभयसिंहराजेंच्या राजकीय कारकिर्दीचा उदय

Published On: Sep 30 2019 1:53AM | Last Updated: Sep 30 2019 1:53AM




सातारा : प्रतिनिधी

देशात लागू झालेल्या आणीबाणीचा मोठा परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर झाला. काँग्रेस फुटल्याने अखिल भारतीय काँग्रेस आणि काँग्रेस आयची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या 1978 च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षातून निवडून आलेले बाळासाहेब देसाई आणि विजयसिंह ना. निंबाळकर यांचा अपवाद वगळता काँग्रेस आयलाही यश आले नाही. अनेक मतदार संघात काँग्रेस आयला उमेदवारही मिळाला नाही. याच निवडणुकीत सातार्‍याच्या राजघराण्यातील अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. केंद्रातील फेरबदलाचा व फुटीचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतो. हे 1978 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरुन स्पष्ट होते. 

देशात आणीबाणीचा काळ असतानाच इंदिरा गांधींनाही लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. याचा फायदा असा झाला की जनता पक्षाला उभारी मिळाली. या नव्या बदलामुळे नव्या राजकीय विचारधारा जुळून आल्या. काँग्रेस विरोधातील वातावरण पुरते ढवळून निघाले. परिणामी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि त्यातच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस आय असे काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काँग्रेसवर झाला. 1978 च्या निवडणुकीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जिल्ह्यात भक्‍कम फळी निर्माण झाल्याने इंदिरा गांधींची काँग्रेस आय जिल्ह्यात फारशी हातपाय पसरु शकली नाही. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आयची दाणादाण उडाली.

कराड दक्षिण मतदार संघावर यशवंतराव मोहिते यांचे वर्चस्व होते. त्यामुळे काँग्रेस आयने त्यांच्या विरोधात उभे केलेले रामजी कृष्णा पाटील हे फारसे प्रभाव दाखवू शकले नाहीत. शेतकरी कामगार पक्षातून शंकरराव पांडुरंग मोहिते यांनी लढत दिली होती. त्यानंतर शंकरराव मोहिते यांना यशवंतराव चव्हाण यांनी प्रशासकीय प्रभावात घेतले. अन्यथा या ठिकाणची राजकीय परिस्थिती आता वेगळीच पहायला मिळाली असती.

कराड उत्तरमध्ये शेतकरी कामगार पक्षाने शंकरराव पाटलोजी पवार यांना उमेदवारी दिली. तर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बाबुराव कोतवाल यांना संधी दिली. तर आय काँग्रेसने भिकोजी आप्पाजी साळुंखे यांना तिकीट दिले. बाबुराव कोतवालांसमोर  साळुंखेच्या रुपाने तकलादू उमेदवार मिळाला. मात्र, केशवराव पवारांच्या मागे अनेकांचे हात एकवटले. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये विजय मिळवता आला असला तरी यशवंतराव चव्हाण यांना आपला उत्तर मतदार संघ राखता आला नाही.

पाटणच्या दौलतराव (बाळासाहेब) देसाई यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर जनता पक्षातून निवडणूक लढवली. राज्याच्या मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्याने त्यांचा संताप अनावर झाला होता. दोनदा मुख्यमंत्री झालेले वसंतराव नाईक आणि त्यानंतर शंकररावांना ही संधी दिल्याने बाळासाहेब देसाई नाराज होते. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही पैकी एका गटात जाण्यापेक्षा त्यांनी जनता दलात जाणे पसंत केले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रतापराव जानुगडे यांना तिकिट दिले तर काँग्रेस आयने देसाई कुुटुंबामध्ये फूट पाडून मरळीच्या भागवतराव देसाई यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बाळासाहेब विजय झाले. या निवडणुकीतील काँग्रेस आयच्या फोडाफोडीच्या राजकारणाने देसाई कुटुंबामधील वाद मात्र बरीच वर्षे धुमसत राहिला. 

सातार्‍यातून दादासाहेब जगताप यांना विरोध वाढत चालल्याने यशवंतराव चव्हाण यांनी नांदगावच्या बाबुराव घोरपडे यांना उमेदवारी दिली. या मतदार संघात काँग्रेस आयला साधा उमेदवारही मिळाला नाही. मात्र, याच निवडणुकीत सातारच्या राजघराण्याचा राजकीय उदय झाला. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांनी जनता दलातून अर्ज भरला आणि ते विजयी झाले.  
वाईमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असल्या तरी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रतापराव भोसलेंनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली होती. काँग्रेस आयने प्रतापराव भोसलेंविरोधात कोंडीराम

बळवंत जयदेडी यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने 1967 च्या निवडणुकीत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे वडील विजयसिंह नाईक निंबाळकरांचे तिकिट कापल्याने त्याचे पडसाद 1978 सालीझालेल्या निवडणुकीमध्ये उमटले. नाईक निंबाळकरांना जनता पक्षाने तिकिट दिले. यशवंतराव चव्हाण यांनी सूर्याजी शंकरराव तथा चिमणराव कदमांना काँग्रेसची उमेदवारी दिली तर काँग्रेस आयने कै. अविनाश धायगुडे-पाटील यांचे वडील माधवराव धायगुडेंना उमेदवारी दिली. विजयसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले. जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदावर असतानाच अखिल भारतीय काँग्रेसने शंकरराव जगताप यांना उमेदवारी दिली. यशवंतराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून जगताप अण्णांची ओळख होती.

जगताप यांच्याविरोधात मात्र काँग्रेस आयला उमेदवार उभा करता आला नाही. जनता पक्षातून कोरेगावचे शांतीलाल भंडारी यांना उमेदवारी मिळाली. बाबुराव गुरव तसेच रहिमतपूरचे नगराध्यक्ष पांडुरंग माने यांनी अपक्ष म्हणून दिलेली लढत निकराची ठरली. विरोधकांच्यात फूट पडल्याने जगताप यांचा सहज विजय झाला. या निवडणुकीवेळी खटावमध्ये बर्‍याच राजकीय घडामोडी घडल्या. 

यशवंतराव चव्हाण यांनी चंद्रहार पाटलांचे तिकिट कापून राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या केशवराव पाटील यांना उमेदवारी दिली. तिकिट कापले गेल्याने संतापलेल्या चंद्रहार पाटलांची काँग्रेस आयमध्ये जाण्यापेक्षा जनता पक्षात जावून तिकिट घेतले. त्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. खटावात केशवराव 42 हजार 404 मतांनी निवडून आले तर काँग्रेस आयला साधा उमेदवारही देता आला नाही. जनता पक्षाच्या चंद्रहार पाटलांना 26 हजार 742 मते मिळाली. 

जावलीत बारा उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी भि.दा. भिलारे गुरुजींनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून निवडणूक लढवली. त्यांनी मानसिंग गेनू मढेेकर या काँग्रेसच्या आयच्या उमेदवाराचा पराभव केला. याचवेळी बाळासाहेब भिलारेंचे वडील मारुती रायजी भिलारे व किरण साबळे-पाटलांचे वडील बाळकृष्ण अनंत साबळे-पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढवली.  

माण मतदारसंघातही चुरशीने निवडणूक झाली. जिजाबा तुकाराम तथा जे. टी. भिंगारदेवे यांनी काँग्रेस आयच्या तिकिटावर निवडणूक लढली. मात्र, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विष्णू तातोबा सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. या निवडणुकीत सदाशिवराव पोळ यांनी ‘किंगमेकर’ म्हणून चांगला रोल वठवला. काँग्रेसच्या फाटाफुटीनंतरही यशवंतराव चव्हाणांचे जिल्ह्यात प्राबल्य राहिले. परंतु, फुटीमुळे काँग्रेस पक्षांतर्गत धुसफुस प्रकर्षाने जाणवू लागली.                         
(क्रमश:)