सातारा : प्रतिनिधी
राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून सातार्यात गुरुवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. राष्ट्रवादी भवन येथे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव घुले यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दंड थोपटल्यामुळे राजकीय जाणकारांचे संबंधित घडामोंडींकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, फलटण, वाई, माण, पाटण या सर्वच्या सर्व विधानसभा मतदार संघांसाठी राष्ट्रवादीने पुन्हा नव्याने व्यूहरचना आखली आहे. भाजपचे वाढते प्रस्थ सातारा जिल्ह्यात थोपवून धरण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च पुढाकार घेतल्यामुळे जिल्ह्यातील घडामोडींकडे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे बालेकिल्ला असलेले सातारा, वाई, कोरेगाव, फलटण, कराड उत्तर या मतदार संघांसह पाटण, माण, कराड दक्षिण या मतदार संघांमध्येही पक्षाने लक्ष घातले आहे. यासाठी माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार व प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव घुले यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक होणार आहे. त्यामध्ये इच्छुकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. जिल्ह्यातील पक्षाचे आजी-माजी खासदार व आमदार, सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीने सुमारे दीड महिने अगोदरपासूनच निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी विधानसभेला इच्छुक असणार्यांकडून मतदार संघनिहाय अर्ज मागवले होते. त्यानुसार 13 इच्छुकांनी ऑफलाईन तर काही इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी राज्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पक्षाने कार्यक्रमही जाहीर केला होता. सातारा जिल्ह्यात फलटण विधानसभा मतदार संघातून आ. दीपक चव्हाण, प्रा. अनिल जगताप, वाईमधून आ. मकरंद पाटील, कोरेगावमधून आ.शशिकांत शिंदे, माणमधून प्रभाकर देशमुख, संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, कविता म्हेत्रे, सूर्यकांत राऊत, कराड उत्तरमधून आ. बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणमधून अॅड. आनंदराव पाटील, अमित पाटील, पाटणमधून सत्यजित पाटणकर यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी राष्ट्रवादी भवन सातारा येथे होणार आहेत. त्यामुळे त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, मुलाखतींसाठी जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील माने व जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केली आहे.