Wed, Aug 12, 2020 12:17होमपेज › Satara › माणगंगेला दहा वर्षांनंतर महापूर

माणगंगेला दहा वर्षांनंतर महापूर

Published On: Sep 26 2019 2:28AM | Last Updated: Sep 25 2019 11:45PM
म्हसवड : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून कोरड्या ठणठणीत पडलेल्या दुष्काळी माण तालुक्यातील माणगंगा नदीला दहा वर्षानंतर महापूर आला आहे. नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने दुष्काळात होरपळणार्‍या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. 1999 व 2011 रोजी असाच महापूर आला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने येथील बळीराजा दहा वर्षे दुष्काळात होरपळला, पाण्यासाठी तडफडला. तगमगलेल्या या जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. सध्या येथील जनता टँकरच्या पाण्यावर तहान भागवत असतानाच मंगळवारी निसर्ग धावून आला. अचानक आभाळ काळवंडून गेले अन् धो-धो पाऊस बरसायला सुरुवात झाली. अवघा माणदेश त्यामध्ये चिंब भिजून गेला. पावसाच्या पाण्याच्या थेंबासाठी आसूसलेली जनता हरकून गेली आहे.

दुष्काळ हा माण तालुक्याच्या पाचवीलाच पुजला गेला आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील  माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भेडसावत आहे.  मात्र, मंगळवारी रात्री निसर्ग माणदेशी जनतेच्या मदतीला धावून आला. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने गेल्या अनेक वर्षांपासून कोरड्या ठणठणीत पडलेल्या दुष्काळी माण तालुक्यातील माणगंगा नदीला दहा वर्षानंतर महापूर आला आहे. नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने दुष्काळात होरपळणार्‍या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

 सन 1999 व 2011 रोजी असाच महापूर आला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने येथील बळीराजा दहा वर्षे दुष्काळात होरपळला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या परतीच्या पावसाने पावसाच्या पाण्याच्या थेंबासाठी आसूसलेली जनता हरकून गेली आहे. तालुक्याची अर्थवाहिणी असलेली माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. माण तालुका पाणीदार व्हावा म्हणून वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करणार्‍या हजारो श्रमदात्यांच्या कष्टाला यश आले आहे. तालुक्यातील सर्व तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत हे दृश्य सुखमय वाटत आहे.

येथील ढालेमामा कॉम्प्लेक्शमध्ये पाणी शिरल्याने मशिनरी व इतर साहित्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. देवापूर शिरताव पुळकोटी या गावांमधील ओढे खचल्याने संपर्क तुटला असून काही अंशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वडजल येथील ओढ्यावरील पूल खचला आहे. जांभुळणी येथील जोगुबाई तलाव 80 टक्के भरला आहे. पळशी-मणकर्णवाडी वाहतूक बंद पडली आहे. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.