Tue, Aug 11, 2020 21:17होमपेज › Satara › पवारांना सोडले अन् उदयनराजे रडले 

पवारांना सोडले अन् उदयनराजे रडले 

Published On: Sep 25 2019 1:47AM | Last Updated: Sep 24 2019 11:09PM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी भावूक प्रतिक्रिया देत राजकीय गोटात खळबळ उडवून दिली. ‘शरद पवार हे मला आदरणीय होते व आहेत, ते मला वडिलांसमान असून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ते सातार्‍यातून उभे राहिल्यास माझी माघार असेल’, असे वक्‍तव्य त्यांनी केले आहे.  शरद पवार सोडले आणि उदयनराजे रडले, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात  सुरू आहे. 

उदयनराजे भोसले हे नेहमीच चर्चेत राहणारे नेते आहेत. राजकारणातील आपली हटके क्रेझ त्यांनी आजही जपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेकदा पक्षाला व शरद  पवारांसह पक्षातील अनेक  नेत्यांना ‘घरचा आहेर’ दिला होता. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी ‘स्टाईल इज स्टाईल’ची आपली प्रतिमा कायम ठेवली आहे. मंगळवारी त्याचा नव्याने प्रत्यय आला. प्रसिध्दी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी शरद पवारांबाबत आपल्या स्टाईलने मात्र भावनिक प्रतिक्रिया दिली. 

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. त्यामुळेे जलमंदिर येथे माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना सातार्‍यातून खा. शरद पवार स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिल्यास तुमची भूमिका काय असेल असे विचारण्यात आले. त्यावर उदयनराजे भोसले म्हणाले, शरद पवार जर निवडणुकीला उभे राहिले तर मी उमेदवारी अर्ज भरणारच नाही. फक्त त्यांनी एकच गोष्ट करावी. दिल्लीतील बंगला आणि गाडीची मला मुभा द्यावी. ते निवडणुकीला उभे राहिले तर मी हिंडायला मोकळा. त्यांनी निवडणुकीला उभं राहावं आणि मला आजमावून बघावं. त्यांनी मला सांगावं, मी नाही ऐकलं तर मला बोला.

शरद पवार माझ्यासाठी काल आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, असे सांगून ते म्हणाले, माझ्या डॅडींनंतर मला सर्वात जास्त प्रेम पवारसाहेबांनी दिले आहे. हे बोलत असतानाच उदयनराजे भावूक झाले. त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. एरवी डॅशिंग व आक्रमक असणारे उदयनराजे माध्यमांसमोर चक्क रडताना दिसले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीश महाजन हे माझे मित्र आहेत. मैत्री वीस पंचवीस वर्षाची कशी तोडणार? त्यांच्याकडे काय मागून मागून मागितल.  फक्त एकच मागितलं सातारसाठी हे करा, ते करा. ऐवढच मागितलं, काय माझ चुकलं, असेही  उदयनराजे भावूकपणे म्हणाले.

दरम्यान, सातार्‍यातील दोन्ही राजेंच्या भाजप प्रवेशानंतर विधानसभा व पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. रविवारी झालेल्या मेळाव्यात शरद पवारांनी उदयनराजेंवर जोरदार टिका केली होती. त्यानंतर उदयनराजेंनी मात्र पवारांबाबत भावूक व सावध प्रतिक्रिया देवून निवडणुकीसाठी पुन्हा तयारी केल्याचे बोलले जात आहे.