Sat, Jul 04, 2020 04:52होमपेज › Satara › आचारसंहितेची कडक अंमलबजावणी

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 21 2019 10:35PM
सातारा : प्रतिनिधी
 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  दि. 27 सप्टेंबर सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. निवडणुकीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्वेता सिंघल म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून 25 लाख 21 हजार 165 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबरपासून प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर दि. 4 ऑक्टोबरला 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे.  5 ऑक्टोबरला 11 वाजल्यापासून छाननी केली जाणार आहे. नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांना  दि. 7 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेता येईल. दि. 21 ऑक्टोबरला  मतदान तर दि. 24 ऑक्टोबरला  मतमोजणी होणार आहे. 

खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारास 10 हजार तर आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारासाठी 5 हजार रुपये अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे. उमेदवाराला 28 लाखांपर्यंत खर्च मर्यादा असून दररोज 20 हजारापर्यंतच रोखीने खर्च करता येईल. निवडणूक खर्चासाठी वेगळे खाते उघडावे लागणार असून खर्च तपासणी पथकाकडे दररोज माहिती द्यावी लागणार आहे. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून माहिती देण्यात आली आहे. मतदान तारखेपासून 48 तासापूर्वी प्रचारास बंदी राहिल.

प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या पत्रकावर संबंधित प्रिंटरर्सचे नाव व पत्ता बंधनकारक आहे. बँकांकडून दररोज आर्थिक व्यवरांची माहिती घेतली जाणार आहे. संशयास्पद व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. जिल्ह्यात 2 हजार 970 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर 15 सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 476 झोनल ऑफिसर्स, 35 भरारी पथक, 9 खर्च तपासणी 9 पथके आदिंची स्थापन केली आहे. मतदान यंत्रांची वाहतूक करणार्‍या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या उल्‍लंघनाची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच 1950 या टोलफ—ी क्रमांवर तक्रार करता येईल. आयोगाच्या ’सिव्हिजील’ अ‍ॅपवरही तक्रार दाखल करु शकता, असेही श्वेता सिंघल यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदि उपस्थित होते.