Fri, Jul 03, 2020 15:23होमपेज › Satara › पुरुषोत्तमाच्या धनुष्याला श्रीरामाचा बाण

पुरुषोत्तमाच्या धनुष्याला श्रीरामाचा बाण

Published On: Sep 08 2019 1:35AM | Last Updated: Sep 07 2019 10:54PM
सातारा  : प्रतिनिधी

खंडाळा तालुक्याचे भूमिपुत्र व शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांची भेट घेतली. खंडाळा तालुक्यावर रामराजेंचा असलेला प्रभाव विचारात घेऊन भूमिपुत्राला साथ देण्यासाठी आपणही शिवबंधनात तातडीने येण्याचा आग्रह पुरुषोत्तम जाधव यांनी धरला. 

पक्षांतराच्या प्रक्रियेत चर्चेत असलेले रामराजे ना. निंबाळकर यांनी जाधव यांचे स्वागत केले. त्यांच्याशी जुन्या फलटण - खंडाळा मतदार संघाबाबत चर्चा केली. या चर्चेतून नव्या वाई-खंडाळा विधानसभा मतदार संघातील गणिते आकाराला येण्याची शक्यता आहेत. पुरुषोत्तमाच्या धनुष्याला श्रीरामाचा बाण मिळाला तर खंडाळ्याच्या हक्काच्या आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. 

खंडाळा तालुका हक्काच्या आमदारकीपासून वंचित आहे. यापूर्वी फलटणच्या रामराजे ना. निंबाळकर यांनी फलटण-खंडाळा या विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले तर वाईच्या मदनराव पिसाळ यांनी वाई-खंडाळा या विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. काहीकाळ मदन भोसले यांनीही वाई-खंडाळा मतदार संघाचे नेतृत्व केले. खंडाळा तालुका संपूर्णपणे वाई मतदार संघाला जोडल्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले. तरीही खंडाळ्यावर रामराजे ना. निंबाळकर यांचा प्रभाव तसाच आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी राजकारणात एंट्री केल्यानंतर खंडाळ्याच्या स्वाभिमानाला त्यांनी फुंकर घातली. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत  खंडाळ्याने पुरुषोत्तम जाधव यांना साथ दिली. त्यानंतर मात्र खंडाळा गटा-तटात  विभागाला गेला. आता या तालुक्यात पुन्हा एकदा स्वाभिमानाचे वारे वाहू लागले आहे. दरवेळेला दुसर्‍या तालुक्यातील व्यक्ती आमदार राहिल्याने खंडाळ्याला गृहित धरले गेल्याची भावना खंडाळ्याच्या कार्यकर्त्यांची आहे. या भावनेला पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा एकदा हात घातला आहे. मुळातच जाधव यांचे लोकसभेचे तिकीट निश्चित होते. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली. खंडाळ्यातून पुरुषोत्तम जाधव यांच्या पुढाकारामुळे नरेंद्र पाटील यांना चांगली मतेही मिळाली आहेत. लोकसभेला थांबविताना जाधव यांना विधानसभा निवडणुकीचा शब्द दिला गेला आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे तिकीटही शिवसेनेच्या वाट्याला जात आहे. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांना सेनेची  व महायुतीची  उमेदवारी मिळेल अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी बेरजेचे राजकारण करण्याचा धडाका सुरु केला आहे. गावोगावी गाठीभेटी घेऊन ते खंडाळ्याचा भूमिपुत्र म्हणून साथ देण्याचे आवाहन करीत आहेत. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांचा फलटण विधानसभा मतदार संघही महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे भाजप की शिवसेना यात रामराजे शिवसेनेला पसंती देऊन पक्षांतर करतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जाधव यांनी रामराजे ना. निंबाळकर यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या हितासाठी आपण तातडीने शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह धरला. रामराजेंनीही जाधव यांच्याशी जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाबाबत चर्चा केली. तुमच्यासारखी सरळ स्वभावाची व विकासाची तळमळ असलेले लोक राजकारणात हवे आहेत, अशा शब्दात रामराजे यांनी जाधव यांचे कौतुक केले. माझ्या राजकीय भविष्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेणार आहे.  मी शिवसेनेत आलो तर निश्चित तुम्हाला मदत करेन, असेही रामराजे म्हणाले. रामराजे व पुरुषोत्तम जाधव यांच्या भेटीमुळे खंडाळ्याची समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. खरोखरच रामराजे शिवसेनेत गेले तर पुरुषोत्तम जाधव यांना मोठी ताकद मिळणार आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.