Wed, Jun 03, 2020 01:39होमपेज › Satara › ५० कोटींच्या रस्त्यांना श्रेयवादाचा रंग

५० कोटींच्या रस्त्यांना श्रेयवादाचा रंग

Published On: Sep 18 2019 1:44AM | Last Updated: Sep 17 2019 11:56PM
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील मुख्य रस्त्यांसाठी 50 कोटींच्या निधीस मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. राजपथ, कर्मवीर पथ (खालचा रस्ता), राधिका रोडचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याने हे रस्ते चकाकणार आहेत. मात्र, हे रस्ते राजे गटाच्या श्रेयवादात अडकण्याची शक्यता आहे. 

सातार्‍यातील रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हे रस्ते करत असताना संबंधित अभियंत्यांकडून खबरदारी घेतली जात नाही. रस्त्यांची कामे करताना संबंधित ठेकेदारावर जबाबदारी सोपवून अभियंते कार्यालयात बसून असतात. त्यामुळे ठेकेदारांकडून मनमानी केली जाते. काही दिवसांतच रस्त्यांवरचे डांबर निघून गेलेले असते. अशा परिस्थितीत सातार्‍यात रोड इंजिनिअरिंग कुठे आहे? असा सातारकरांना प्रश्‍न पडतो. रस्त्यांवर प्रचंड पैसे खर्च केले जात असले तरी रस्त्याचा दर्जा मात्र सुधारला जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. 

सातार्‍याचे रूपडे पालटण्यासाठी सातार्‍याच्या दोन्हीही नेत्यांनी चंग बांधला आहे. दोघांचाही पक्षांतराचा निर्णय होताच सातार्‍यात निधी येण्यास सुरुवात झाली आहे.  सातार्‍यातील रस्त्यांसाठी 50 कोटींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि या निधीला तत्त्वत: मंजुरी मिळाली. मुख्याधिकार्‍यांकडून संबंधित रस्त्यांचे प्रस्ताव मागण्यात आले आहेत. राजपथ, खालचा रस्ता (कर्मवीर पथ) तसेच राधिका रोड हे मुख्य रस्ते काँक्रीटचे करण्याचा पालिकेतील एका गटाचा मानस आहे. तर पाणी साचणार्‍या सखल भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे दुसरा गट सांगत आहे.      

भविष्यात रस्त्यांच्या प्राधान्यक्रमावरुनही दोन्ही गटांत युध्द होण्याची शक्यता नाकारत येत आहे. 50 कोटींचा पाहिला टप्पा मंजूर झाला असून भरघोस येणार्‍या निधीमुळे रस्त्यांची कामे  होतील. डांबरी रस्त्यांना काँक्रिट लागल्याने रस्ते चकाकतील. मात्र, रस्त्यांच्या कामांवरुनही श्रेयवाद सुरु असल्याचे चित्र आहे. या रस्त्यांसाठी आम्ही प्रयत्न केल्याचे दोन्ही आघाडया सांगत आहेत. निधी अजून आलेला नाही आणि रस्त्यांचीही कामे सुरु झाली नसताना आघाडयांकडून मात्र, आगामी निवडणुका समोर ठेवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या निधीसाठी पाठपुरावा केल्याची स्पर्धा दोन्ही आघाडयांमध्ये लागली असल्याचे चित्र सातारा पालिकेत दिसत आहे.