Thu, Jul 02, 2020 18:57होमपेज › Satara › वाईचा कृष्णा पूल अवजड वाहतुकीला बंद

वाईचा कृष्णा पूल अवजड वाहतुकीला बंद

Last Updated: Jan 30 2020 2:08AM
वाई : पुढारी वृत्तसेवा 

वाई शहरातील कृष्णा पूलाला 125 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. पुलावरील वाहतुकीची वर्दळ व पुलाच्या कडेला विविध प्रकारची झाडे उगवल्याने हा पूल खिळखिळा झाला आहे. अवजड वाहनांच्या जाण्याने हा पूल हलत असल्याने हा पूल बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांनी केली होती. मात्र, यावर कार्यवाही करण्यात आली नव्हती. परंतु, आता पोलिस यंत्रणा व पालिकेला शहाणपण सूचले असून अखेर हा पूल अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यातही हा पूल बंद करण्याची सूचना एका कमानीवर लिहली असून अवजड वाहनांना ही बाब समजू न शकल्याने अवजड वाहनांचा प्रवास सुरूच आहे. यासाठी एका बाजूला बॅरिकेटस्वर फ्लेक्सद्वारे याची माहिती वाहनधारकांना द्यावी, अशी मागणी होत आहे. 

वाई हे ऐतिहासिक शहर असून बि—टीशांची सत्ता असताना साधारण 125 वर्षापूर्वी हा पूल वाहतूकीसाठी उभारण्यात आला होता. यानंतर वेळोवेळी या पूलाची डागडुजी करण्यात आली. परंतु, पुलामध्ये झाडे उगवल्याने दगडांमध्ये चीरा पडू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक दगड निसटू लागल्याने पूल धोकादायक झाला आहे. याबाबत वारंवार मागणी केल्यानंतर पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बार लावून हा पूल बंद केला आहे.

आता या पुलावरून फक्‍त हलक्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. हा पूल बंद करण्याची सूचना देण्यासाठी कमान लावण्यात आली आहे. मात्र, या कमानीलाही वाहने धडकल्याने या कमानी वाकल्या आहेत. यापूर्वी वाई पालिकेने पावसाळ्यापूर्वी वाहतूक बंद केली होती. मात्र, दुसर्‍या पुलावर अपघात झाल्याने व त्या पुलाचे काम रेंगाळल्याने कृष्णा पूल वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला होता. हा पूल वाहतूकीसाठी बंद केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे. 

हा पूल बंद केल्याने महागणपती पुलावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या पूलावर उसाची ट्रॉली थांबत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महागणपती पुलावरून जड वाहतुक वाढल्याने वाहतुक कोंडी वाढली आहे. त्यातच अनेक वहाने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

नव्याने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे

वाई शहरामध्ये कृष्णा व महागणपती हे दोन मुख्य पूल आहे. यावरच शहरातील बहुतांश वाहतूक आहे. मात्र, आता कृष्णा पूल बंद झाल्याने महागणपती पुलावर ताण आला आहे. हा पूलही बि—टीशकालीनच असून या पुलाची उंची कमी आहे. कृष्णा पूलाप्रमाणेच या पुलामध्येही झाडे उगवल्याने दगडे निसटू लागली आहे. त्यातच रस्त्यांची रूंदी कमी असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यामुळे आता वाईकरांची गैरसोय होणार असून यासाठी नव्याने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे आहे.