Mon, Jul 13, 2020 08:06होमपेज › Satara › ‘सिव्हिल’चा अजब उपचार; रुग्णाचे ‘डबल ऑपरेशन’

‘सिव्हिल’चा अजब उपचार; रुग्णाचे ‘डबल ऑपरेशन’

Published On: Sep 11 2019 2:31AM | Last Updated: Sep 10 2019 10:53PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे (सिव्हिल) लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच रुग्णसेवेचेही तीन-तेरा वाजल्याचे समोर आले आहे. अजित पवार नामक जावली तालुक्यातील रुग्णाला सिव्हिलमधील   अजब उपचारामुळे दोनदा शस्त्रक्रिया करावी लागली. दहा दिवस या रूग्णाची अक्षरश: हेळसांड झाली. सिव्हिलने बसवलेली जाळी दुसर्‍या ऑपरेशनमध्ये बदलण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सिव्हिलबाबत संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अजित उध्दव पवार (वय 40, रा.भिवडी ता.जावली. सध्या रा.मंगळवार पेठ, सातारा) यांनी दै.‘पुढारी’जवळ सिव्हिलमध्ये झालेल्या बोगस उपचाराची कैफियत मांडली आहे.
अजित पवार यांच्या पोटात दोन महिन्यांपूर्वी दुखू लागल्याने ते सिव्हीलमध्ये उपचारासाठी गेलेे होते. केसपेपर काढून तपासणी केली असता त्यांना  हर्निया झाला असल्याचे सांगून ऑपरेशनचा सल्‍ला देण्यात आला. प्रारंभी दि. 2 ऑगस्ट रोजी ऑपरेशन ठरले. मात्र, नंतर अचानक 17 ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले. त्यानुसार दि. 17 रोजी ते पुन्हा सिव्हीलमध्ये उपचार व शस्त्रक्रियेसाठी अ‍ॅडमिट झाले. दि. 19 ऑगस्ट रोजी ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यानंतर भूल उतरल्यानंतर त्यांच्या पोटात अधिकच दुखू लागले. डॉक्टर व सिव्हील स्टाफला याबाबत माहिती दिली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. हा त्रास कमी न होता अधिकच बळावला. सिव्हीलमध्ये त्यांना दि. 27 ऑगस्टपर्यंत अ‍ॅडमिट करुन ठेवण्यात आले. मात्र तोपर्यंत पोट दुखीचा त्रास पहिल्यापेक्षा अधिकच वाढत गेला.

पोट दुखीचा होत असलेला त्रास असाह्य झाल्याने अजित पवार यांनी कुटुंबिय व मित्राला बोलावून सिव्हीलमधून डिस्चार्ज घेण्याचा निर्णय घेतला. डिस्चार्ज घेतल्यानंतर ते खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट झाले. खासगी रुग्णालयात उपचाराला सुरुवात झाल्यानंतर त्यांना तेथे मूळ ऑपरेशन झालेल्या ठिकाणीच पुन्हा ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. कारण बसवलेल्या जाळीमध्ये पल्स (पू) झाल्याने ती जाळी बदलावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्या कारणामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्याचे स्पष्ट झाले.

पवार कुटुंबियांनी खासगी डॉक्टरला दुसर्‍या ऑपरेशनची सहमती दर्शवली. त्यानुसार त्याठिकाणी पुन्हा नव्याने जाळी बसवण्यात आली. या ऑपरेशननंतर अजित पवार यांचा पोट दुखीचा त्रास कमी होवून तो पुढे नाहीसा झाला. अद्याप त्यांना घरी बेडरेस्ट घेण्यास सांगितलेले आहेे.

अजित पवार यांच्या कुटुंबामध्ये आई, वडील, पत्नी, दोन मुले आहेत. सर्व कुटुंबिय अजित पवार यांच्यावरच पूर्णत: अवलंबून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे सलूनचे दुकान बंद ठेवावे लागले आहे. सिव्हीलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जर ऑपरेशन करणारे डॉक्टर, शिकावू डॉक्टर व स्टाफने योग्य खबरदारी घेतली असती तर पवार यांच्यावर दुसर्‍यांदा ऑपरेशन करायची वेळ आली नसती. यामुळे या सर्व प्रकरणाला सिव्हीलचे डॉक्टर व तेथील स्टाफ जबाबदार आहे. सिव्हीलमुळे त्यांना मानसिक त्रास होवून शारिरीक व आर्थिक नुकसान झाले असल्याचा आरोप त्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना केला आहे.
दरम्यान, सध्या लाचखोरी प्रकरणामुळे सिव्हील लाईमलाईटमध्ये आहे. एकीकडे लाचखोरी व दुसरीकडे रुग्णसेवेचा बोजवारा उडाल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.